
आधी कोरोनाचा गोंधळ आणि आता रोहित शर्मा व विराट कोहली या कर्णधारांची काही मालिकांत गैरहजेरी असा नकारात्मक घटनांचा दुर्दैवी टिळा टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱयाला लागणार हे स्पष्ट झाले आहे. आधी दुखापतींमुळे ‘हिटमॅन’ आणि वन डे कर्णधार रोहित शर्माला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर आता कसोटी कर्णधार विराट कोहलीने वन डे मालिका खेळण्यास असमर्थतता व्यक्त केल्याने बीसीसीआयपुढील अडचणी वाढल्या आहेत. कसोटी कर्णधार विराटला रोहितच्या नेतृत्वाखाली खेळायचे नसल्याने तो घरगुती कारण सांगून वन डे सीरिज टाळतोय अशी टीका आता नेटकरी आणि क्रिकेटशौकीन विराटची भूमिका समजल्यावर करीत आहेत. अनेक वरिष्ठ क्रिकेटपटूंनीही विराटच्या या अवचित नकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. टीम इंडियात आता मानापमाननाटय़ रंगत असल्याचा वास अनेकांना येत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी लढतीची मालिका खेळल्यानंतर वन डे मालिका खेळवली जाणार आहे. विराट कोहलीला वन डे आणि टी 20 संघाच्या कर्णधारपदावरून दूर केल्यावर त्याची नाराजी स्वाभाविक असल्याची कुणकुण लागली होती. त्यानंतर रोहित शर्मा सराव करताना जायबंदी झाल्याने कसोटीत खेळणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. आज विराट कोहलीने आपण घरगुती कामांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचे जाहीर करीत बीसीसीआयवर मोठा बॉम्बगोळाच टाकला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱयावर जाण्यापूर्वी टीम इंडियाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. हा सर्व प्रकार म्हणजे विराट आणि रोहित यांना एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळायचे नाहीय असेच दर्शवतो असे अनेकांचे म्हणणे आहे. विराटची मुलगी वामिका हिचा पहिला वाढदिवस 11 जानेवारीला आहे. त्याच दिवशी तिसरी कसोटी लढत सुरू होतेय. त्या कसोटीत विराट खेळणार आहे. पण 19 जानेवारीपासून सुरू होणाऱया वन डे मालिकेसाठी तो नाही म्हणतोय. त्यामुळे विराटच्या मनात वन डे आणि टी-20 संघाचे कर्णधारपद काढून घेतल्याची सल कायम आहे. या तर्काला पुष्टी मिळतेय.
बोर्ड म्हणते अजून विराटची अधिकृत विनंती आमच्याकडे आली नाहीय
कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या विश्रांतीच्या बातम्या येत असतानाच हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मात्र वेट ऍण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. आम्हाला विराटकडून जानेवारीत विश्रांती हवी अशी अधिकृत विनंती आलेली नाहीय असे सांगितले. त्यामुळे तशी विनंती आल्यावर पुढचे बघू अशी भूमिका बोर्डाने घेतली आहे.
क्रिकेटमधून ब्रेक घेणे योग्य, पण असा अवचित सहभाग नाकारणे योग्य नाही – अझरुद्दीन
कसोटी कर्णधार विराट कोहली घरगुती कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेत वन डे खेळणार नाही आणि रोहित शर्मा दुखापतींमुळे कसोटी मालिकेत सहभागी होणार नाहीय. योग्य कारणांसाठी क्रिकेटमधून ब्रेक घेणे ठीक आहे. पण परदेश दौऱयाच्या तोंडावर असा अवचित सहभाग नाकारण्याचा निर्णय संघासाठी ठीक नाहीय, असा नाराजीचा सूर माजी हिंदुस्थानी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने विराटच्या निर्णयावर टिप्पणी करताना काढला आहे. अझर म्हणतो, खेळातून माघार घेण्याच्या निर्णयासाठी ही वेळ मुळीच योग्य नाहीय. कारण मोठय़ा खेळाडूंच्या अशा अकाली धक्कादायक निर्णयांमुळे टीम इंडियाचे मनोधैर्य निश्चितच कमी होण्याची भीती आहे.
रोहितला मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीतून बरे व्हायला किमान चार आठवडे हवेत
रविवारी वांद्रे बीकेसी येथे फलंदाजीचा सराव करताना 32 वर्षीय रोहित शर्माच्या हातावर चेंडू जोरात आदळला होता. पण त्यानंतरही त्याने सराव केला होता. मात्र सायंकाळी रोहितच्या मांडीच्या स्नायूंच्या दुखापतींनी उचल खाल्ल्याचे सांगण्यात आले. या दुखापतीतून सावरायला त्याला किमान चार आठवडे लागतील असे स्पष्ट झाले. त्यामुळे रोहित कसोटी मालिकेत खेळणार नाही हे स्पष्ट झाले. कसोटीनंतर होणाऱया वन डे मालिकेत कर्णधार म्हणून रोहित शर्मा खेळणार आहे. पण आता विराटच्या नकारामुळे हे उभय कर्णधार एकमेकांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार नाही हे उघड झाले आहे.

























































