
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम याने आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. विशालने त्याची सहकलाकार आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्यासोबत 10 फेब्रुवारी 2026 रोजी विवाहगाठ बांधली. विशेष म्हणजे विशालने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या खास सोहळ्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे, ज्यामुळे त्याच्या आनंदाला उधाण आले आहे.
विशालने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी देताना चाहत्यांचे आभार मानले. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छांबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. प्रवासाच्या धावपळीमुळे आणि विवाह सोहळ्याच्या व्यस्ततेमुळे कोणाचेही फोन किंवा मेसेज स्वीकारता आले नाहीत, त्याबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली. महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने आपण आणि आपली सखी अक्षया आता विवाहबंधनात अडकल्याचे सांगत त्याने ‘लग्न सुफळ संपूर्ण’ झाल्याची घोषणा केली. तसेच लग्नाचे फोटो लवकरच चाहत्यांसाठी पोस्ट करणार असल्याचेही त्याने नमूद केले.
View this post on Instagram
विशाल आणि अक्षया यांनी स्टार प्रवाहवरील ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेतील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती आणि आता हीच जोडी खऱ्या आयुष्यातही कायमची एकत्र आल्याने चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशालने यापूर्वी ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतून घराघरात ओळख निर्माण केली असून, सध्या तो ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याने गुपचूप उरकलेल्या या लग्नामुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत सध्या याच लग्नाची चर्चा रंगली आहे.

























































