पेणमध्ये विशाळगड, पन्हाळगड, पावनखिंड; शिवसेनेची किल्ले स्पर्धा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास तरुण पिढीच्या मनात रुजावा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेने किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला पेणमधील बालमावळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मुलांनी विशाळगड, पन्हाळगड, पावनखिंड, प्रतापगड, सिंहगड अशा विविध गडकिल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या होत्या.

शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रदेश सचिव श्रीतेज कदम यांच्या पुढाकाराने या भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पेणच्या शिवसेना कार्यालयात रायगड संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या स्पर्धेत नांदीमाळ नाका येथील श्री विश्वेश्वर कृपा मित्रमंडळाने साकारलेल्या प्रतापगड किल्ल्याने प्रथम क्रमांक पटकावला. तर कुंभारआळी येथील क्रांती कॉम्प्लेक्स बाल मित्रमंडळाच्या सिंहगडाच्या द्वितीय व दातारआळी येथील हर्षित, आराध्य, पार्थ यांच्या विशाळगड, पन्हाळगड व पावनखिंडने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

यावेळी जिल्हा समन्वयक नरेश गावंड, जिल्हा संघटक विजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुमित बामणे, वाहतूक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेश सोनवणे, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, उपतालुकाप्रमुख चेतन मोकल, शहरप्रमुख सुहास पाटील, शहर उपाध्यक्ष सचिन बांदिवडेकर, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम म्हात्रे, युवासेनेचे राकेश मोकल, रोनिक झेमसे, सुयश पाटील, समीर साठी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.