सस्पेन्स संपला! छत्तीसगढच्या मुख्यमंत्रीपदी विष्णु देव साय यांची वर्णी, आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब

नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगढमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार याचा पेच गेल्या 7 दिवसांपासून सुरू होता. अखेर यावर शिक्कामोर्तब झाला असून विष्णु देव साय (Vishnu Deo Sai) यांची मुख्यमंत्रपदी वर्णी लागली आहे. आज झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

छत्तीसगढमध्ये 90 जागांपैकी भाजपने 54 जागा जिंकत बहुमत मिळवले, तर काँग्रेसला 35 जागांवर समाधान मानावे लागले. 3 डिसेंबरला निकाल लागल्यानंतरही मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट झाले नव्हते. गेल्या 7 दिवसांपासून यासाठी बैठकांवर बैठका सुरू होत्या. अखेर यावर आज शिक्कामोर्तब झाला.

मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार होते. रमन सिंह, अरुण साव, ओपी चौधरी आणि रेणुका सिंह यांचे नाव आघाडीवर होते. मात्र भाजपने धक्कातंत्र वापरत आदिवासी चेहरा असणाऱ्या विष्णु देव साय यांची निवड केली.

यासाठी नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पार पडली. या बैठकीला केंद्रीय मंत्री सर्बानंदा सोनोवाल, अर्जुन मुंडा यांच्यासह दुष्यंत कुमार गौतम आणि भाजप प्रभारी ओम माथूरही उपस्थित होते. चर्चेनंतर विष्णु देव साय यांची निवड करण्यात आली. दिल्लीतील भाजप नेतृत्वानेच हे नाव पुढे केल्याची माहिती मिळतेय.