
>> शेफ विष्णू मनोहर
कधीतरी अंतर्मुख व्हायला मला आवडतं… यातून स्वतःशीच बोलता येतं आणि बऱयाच प्रश्नांची उत्तरं अगदी सहज सापडून जातात… आपल्या सदरानिमित्त मी नेहमी एखाद्या मान्यवराशी गप्पा मारून त्याची आवड-निवड शोधण्याचा प्रयत्न करतो… पण आज थोडा स्वतःचा शोध घ्यायचे ठरवले आणि स्वतःबरोबरच डेटवर गेलो…
मी घरी असलो तर दहा ते साडेदहाच्या दरम्यान मला प्रचंड भूक लागते आणि शक्यतो फोडणीचे वरण किंवा आमटी असेल तर गरम गरम खायला आवडते. त्याच्याबरोबर एखादी चमचमीत भाजी, डावीकडे लिंबू, पापड, कांदा लागतोच. ते नसेल तर माझी चिडचिड होते. मी एक कलाकार आहे पण खाण्याच्या क्षेत्रातला. आम्हाला फर्माईश असते ती रेसिपीज बनवलेल्या खा असे किस्से सतत घडत असतात. एकदा परभणीला एका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गेलो होतो. तेव्हा पाचशे बायका रेसिपीज घेऊन उभ्या होत्या आणि परीक्षक म्हणून मी एकटाच होता आणि मग आयोजक म्हणाले, ज्या रेसिपीज चांगल्या दिसतात त्यातल्या काही टेस्ट करून बघा. पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं एवढय़ा लोकांचे पदार्थ टेस्ट करायला दोन-अडीच तास लावले, पाव चमचा वगैरे टेस्ट केले नंतर त्याचा थोडा त्रास झाला. त्यातल्या थोडय़ा रेसिपीज निवडल्या आणि निभावून घेतले.
शेफ होईन असे कधी ठरवले नव्हते. मला खायला आवडायचे. खाण्याचा खूप शौकीन होतो. खरंतर मी चित्रकार आणि माझे वडिलही चित्रकार. केटरिंगमधल्या एका व्यक्तीशी ओळख झाली आणि मग त्यांना मदत करु लागलो. त्यांच्यासोबत काम करता करता मला केटरिंगमध्ये आवड निर्माण झाली. त्यांची ती मांडणी, मोठय़ा प्रमाणात स्वयंपाक हे सगळं मला आवडू लागले. एकदा काय झाले माहीत नाही ते मला दोन शब्द असे बोलले की माझ्या ते जिव्हारी लागले. म्हणून मी जिद्दीने केटरिंग व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. दहावीत असताना हा व्यवसाय सुरु केला. आईला सोबत घेऊन कामं घ्यायचो आणि पूर्ण करून द्यायचो. मी वेगवेगळे पदार्थ कसे शिकायचो तर एखाद्या चौकात समोसा चाटवाला असेल तर त्याच्याजवळ जायचो आणि उभा राहायचो. एक प्लेट घेऊन तासनतास तिथे उभा राहून ते कसे करतात ते पाहायचो, पावभाजी पण त्याच्या गाडीजवळ उभा राहून राहून शिकलो. त्यातून स्वतःची एक स्टाईल निर्माण केली. मी डिझाईन केलेले पदार्थ लोकांना आवडू लागले
सांडग्याची भाजी
साहित्य – 2 वाटय़ा सांडगे, 2 मोठे कांदे, टोमॅटो 2-3, खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, घरगुती काळा मसाला, फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता
कृती – कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात सांडगे भाजून घ्यावेत. सांडगे भाजताना सुरुवातीला गॅस माध्यम आचेवर असावा व नंतर तो मंद आचेवर करावा. म्हणजे सांडगे खरपूस भाजले जातील. सांडग्यांचा रंग बदलून तो सोनेरी झाला व ते छान आतपर्यंत भाजले गेले की कढईतून काढावेत. त्याच कढईत थोडेसे तेल घालावे. सांडगे तेलात भाजले असल्यामुळे त्याला असलेले तेल लक्षात घेऊन बेताचेच कांदा परतेल इतपत तेल घालावे. तेलाला जिरे , मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यावी. आता यात चिरलेला कांदा घालावा. कांदा गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा. यात छोटा चमचा हळद घालावी. चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यावे. आवडीनुसार 1 ते 2 चमचे कांदा-लसूण मसाला/ काळा मसाला यात घालावा. सर्व व्यवस्थित परतून घ्यावे. काळा मसाला नसल्यास लाल तिखट घातले तरी चालेल.
फोडणीचे वरण
साहित्य – 1 कप तुरीची डाळ, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, 1/4 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून हळद, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या , 5-6 कढिलिंब, 1 इंच मोठा तुकडा किसून घेतलेला आलं, 1 टेबलस्पून बारीक कापलेले लसूण, मीठ, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर.
कृती – तुरीची डाळ धुऊन त्यात 2 कप पाणी घाला क प्रेशर कुकरमध्ये तीन शिट्टय़ा होईपर्यंत शिजवून घ्या. तीन शिट्टय़ा झाल्यावर पाच मिनिटे गॅस बारीक करून ठेवा व मग बंद करा. कुकर गार झाल्यावर शिजलेली डाळ बाहेर काढून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे, हिंग, हळद व हिरव्या मिरच्या घाला. मग त्यावर कढिलिंब, किसलेलं आलं व बारीक चिरलेला लसूण घाला. आलं व लसूण किंचित ब्राउन दिसेपर्यंत थोडे परतून घ्या. मग त्यावर शिजलेली डाळ घालून, डाळ किती पातळ करायची आहे त्याप्रमाणे पाणी घाला. चवीप्रमाणे मीठ व टोमॅटो घाला व मधे मधे हालवत बारीक आचेवर डाळीला उकळी येऊ द्या. मग गॅस बंद करून करून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
उपवासाची खिचडी
साहित्यः 1 वाटी साबुदाणा, 3/4 काटी दाण्याचे कूट, 3-4 कापलेल्या हिरव्या मिरच्या (आवडीनुसार), मीठ, 1 लहान चमचे साखर, 1 लहान चमचा जिरे, बारिक चिरलेली कोथिंबीर, खवणलेले ओले खोबरे, तूप, ताक
कृतीः साबुदाणा खिचडी करण्याआधी कमीतकमी 5 ते 6 तास साबूदाणा भिजवून ठेवणे. साबुदाणा भिजवताना पुरेसे पाणी घातल्यावर थोडे पाणी भांडे तिरके केल्यास वरती राहिले पाहिजे. खिचडी करण्यागोदर भिजवलेला साबुदाणा मोकळा करून घेणे. त्याला किंचित ताक लावणे व 10 मिनिटे तसेच ठेवणे. नंतर त्यात मीठ, साखर, 1/4 चमचा जिरे, दाण्याचे कूट, कोथिंबिर, खोबरे घालून हाताने एकसारखे मिश्र करावे. कढईत दीड लहान चमचा तूप तापवून जिरे, मिरच्या घालून फोडणी करणे व वरील मिश्रण घालून हलवणे. झाकण ठेकून 3-4 वेळा हलवून चांगली वाफ आणणे. तयार झालेल्या गरम खिचडीवर आवडीनुसार कोथिंबीर आणि खोबरे खाण्याआधी घालावे.






























































