
सामना प्रतिनिधी । मुंबई
पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या विश्वजीत कदम यांनी विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना शपथ दिली. माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. काँग्रेसने येथे स्व. पतंगराव कदम यांचे चिरंजीव व युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली होती. विश्वजीत यांना शिवसेनेसह सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. भाजपनेही नंतर आपला उमेदवार मागे घेतल्याने विश्वजीत कदम यांची बिनविरोध निवड झाली होती. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विधीमंडळाचे अनेक सदस्य तसेच सांगली जिह्यातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



























































