श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात स्वच्छता सुरु, मंदिर उघडण्याच्या निर्णयामुळे चैतन्य

राज्य सरकारने येत्या 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिकस्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वारकरी भाविक आणि पंढरपुरातील व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मंदिर समितीने दर्शन मंडप आणि मंदिराची साफसफाई हाती घेतली असून, युद्धपातळीवर हे काम सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 5 एप्रिल 2021पासून पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यान आलेल्या यात्रादेखील प्रातिनिधिक स्वरूपात साजऱ्या करण्यात आल्या.

मंदिरे उघडा यासाठी राज्यभरातील भाविकांतून मागणी होत होती, याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने 7 ऑक्टोबरपासून काही अटी, नियम घालून मंदिरे उघडण्यास संमती दिली आहे. मंदिर व्यवस्थापनाला भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विशेष सूचना दिल्या आहेत. मंदिर उघडण्याने कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.

दर्शनाबाबत शासनाकडून अद्याप सविस्तर खुलासा आला नसल्याने दर्शन पदस्पर्श करून असणार की मुखदर्शन यावर निर्णय झालेला नाही. याबाबत मंदिर समिती एक बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याचे समजते आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे श्री विठ्ठल मंदिर पहिल्यांदा मार्च 2020 मध्ये बंद करण्यात आले. कोरोनाची पहिली लाट काहीशी ओसरल्यानंतर मुखदर्शन सुरू करण्यात आले होते. मात्र, पुन्हा दुसरी लाट सुरू झाल्याने मंदिर पुन्हा बंद करण्यात आले. त्यामुळे मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद होते.

मंदिर बंद असल्याने पंढरपूरची बाजारपेठ ठप्प झाली होती. आता पुन्हा मंदिर सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्याने भाविक आणि विशेषतः व्यापारी वर्गात चैतन्याचे वातावरण आहे.

शिवसैनिकांनी पेढे वाटले

मंदिर उघडण्याचा निर्णय झाल्यानंतर पंढरपूरमधील शिवसैनिकांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.

कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून मंदिर बंद आहे. या कालावधीत मंदिरातील नित्य उपचार व पूजाअर्चा सुरू आहेत. मात्र, दर्शन मंडप आणि मंदिराचा इतर भाग आता वापरात येणार आहे. त्यामुळे समितीने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

– बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल मंदिर समिती पंढरपूर

आपली प्रतिक्रिया द्या