
आषाढी एकादशीआधी एक दिवस गोदावरी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या फळया काढण्यात आल्या. तसेच झालेल्या पावसाने हजेरी लावल्याने गोदावरी नदीला पाणी आले. त्यामुळे विठ्ठल भक्तांना आषाढीनिमित्त दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या कोपरगाव येथे गोदावरी स्नानाची पर्वणी साधता आली.
नाशिक इगतपुरी भागात 28 जून रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढील प्रमाणे तर कंसातील आकडे एकुण पाऊस दर्शवितो. दारणा 65 (103), गंगापुर 22 (85), इगतपुरी 164 (382), त्रंबकेश्वर 10 (76), नाशिक 4 (38), नांदुर मध्यमेश्वर 12 (33), देवगाव 13 (73), ब्राम्हणगांव 50 (103), कोपरगाव 27 (75) पढेगांव 18(102), सोमठाणे 00 (40), कोळगांव 18 (48), सोनेवाडी 29 (72), शिर्डी 9 (44), राहाता 5 (83), राजणगांव खुर्द 3 (75), चितळी 9 (27), तर धरण कार्यक्षेत्रात वाकी 107 (154), भाम 82 (100), भावली 130 (374), वालदेवी 0 (8), काश्यपी 8 (59), गौतमी 15 (66), कादवा 46 (75), आळंदी 11 (18), पालखेड 7 (21). याप्रमाणे पाऊस झाला आहे. दारणेत 1875 (12 टक्के), गंगापुर (29 टक्के), तर मुकणे 35 टक्के पाणीसाठा आहे.
गोदावरी नदीवर कानळदपासून नाऊरपर्यंत वडगाव-कानळद, खेडलेझुंगे, हिंगणी, मंजुर, डाउच, माहेगांव देशमुख, सडे, शिंगवे, पुणतांबा आणि नाउर असे दहा कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. यात साठविल्या जाणाऱ्या पाण्याचा गोदाकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होतो. यंदा मान्सुन एक महिना उशीरा सुरू झाला त्यामुळे गोदाकाठच्या पिकांना फटका बसला आहे. खेडलेझुंगे आणि हिंगणी बंधाऱ्यात मागील हंगामात साठलेले पाणी फळया टाकुन अडविले होते. या वर्षी पावसाळा सुरू होण्याआधी यातील फळ्या काढल्या जातात. त्यामुळे गोदावरी नदीला काही प्रमाणात पाणी आले आहे. या पाण्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना गंगास्नानाची पर्वणी मिळाली आहे. परिणामी खेडलेझुंगे आश्रम, दत्त देवस्थान (माहेगाव देशमुख), शिवानंदगिरी महाराज आश्रम (मंजुर), राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम, जुनी गंगा जगदंबा मंदिर, गुरू शुक्राचार्य, कचेश्वर देवस्थान (कोपरगाव बेट), शृंगेश्वर आश्रम, चक्रधरस्वामी आश्रम (संवत्सर), रामदासीबाबा, हेमाडपंथी महादेव मंदिर, (कोकमठाण), नृसिंह देवस्थान (कान्हेगाव), चांगदेव देवस्थान (पुणतांबा), याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.



























































