विवा होम्सच्या मेहुल ठाकूर आणि सी.ए.ला चार दिवसांची कोठडी, ईडीने केली नऊ तास चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या विवा ग्रुपमधील कार्यालयात छापा मारत ईडीने तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर ठाकूर यांचे चुलतभाऊ दीपक ठाकूर यांचा मोठा मुलगा मेहुल ठाकूर आणि त्यांच्या कंपनीचे चार्टर्ड कन्सल्टंट मदनगोपाल चतुर्वेदी यांना अटक केली. या दोघांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीएमसी बँक घोटाळ्यासंदर्भात ईडीचे चौकशीसत्र सुरू आहे. ईडीचे अधिकारी हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपच्या वसई, विरार आणि पालघरमधील कार्यालयांवर धडकले. एचडीआयएलने विवा ग्रुपशी काही आर्थिक व्यवहार केला होता का? याची चौकशी त्यांनी सुरू केली. शुक्रवारी नऊ तास ईडीच्या अधिकाऱयांनी चौकशी केल्यानंतर सायंकाळी उशिरा पुढील कारवाई करण्यात आली.

विवा होम्सशी आर्थिक संबंध नाही

विवा ग्रुप हा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. त्यामुळे ईडीने हितेंद्र ठाकूर यांच्यावर कारवाई केल्याची चर्चा होती. मात्र आमदार ठाकूर यांनी त्याचा इन्कार केला. माझा परिवार मोठा आहे.

विवा होम्सशी माझा काही आर्थिक संबंध नाही. माझ्या निकटवर्तीयांवर कारवाई करून ईडीने मला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व दिले आहे, असा टोला त्यांनी लगावला. यामागे राजकीय षड्यंत्र आहे का? हे पाहत आहोत, पण आताच बोलणे योग्य नाही, असेही ठाकूर म्हणाले.