वाहनांच्या पाठीमागे बसवलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई नाही

पर्यावरणास अनुकूल, व्यायामाचे एक साधन त्याचप्रमाणे कोणत्याही भागाच्या शेवटच्या स्थानापर्यंत सहज जाता येते. याकरीता जगातील अनेक देशांमध्ये बरेचजण वाहनाचा वापर न करता सायकलचा वापर करत असतात, याकरिता बरेचसे वाहनधारक आपल्या वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून त्याचा वापर करतात. आपल्या देशातही वाहनधारक वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून सायकल वाहून नेताना आढळतात. मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमात वाहनांच्या पाठीमागे सायकल कॅरीअर लावण्याबाबत कुठेही प्रतिबंध नाहीत, असे असतानादेखील अशा वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सायकल कॅरीअरवर कुठलीही कारवाई यापुढे होणार नसल्याचे परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे.