
>>विवेक दिगंबर वैद्य
श्रीस्वामी समर्थ संप्रदायातील तेजस्वी हिरा म्हणून सुपरिचित असणाऱ्या श्रीतात महाराज यांच्या अवतारकार्याचा हा परिचय.
मुंबईच्या धोबीतलावनजीक जांभूळवाडी येथे राहणाऱ्या गौड सारस्वत ज्ञातीच्या भेंडे (बेरडकर) कुटुंबामध्ये श्रीतात महाराजांचा जन्म झाला. श्रावण वद्य एकादशीस जन्मलेल्या श्रीतात यांचे नाव रामचंद्र ठेवण्यात आले. त्यांचे वडील व्यंकटेश भेंडे, हरडे व अन्य जिन्नसांचा व्यापार करीत असत. लहानगा रामचंद्र त्याच्या वयाच्या तिसऱया वर्षापासून श्रीशिवोपासनेत मग्न राहत असे.
बालवय आणि पोरवय सरल्यावर श्रीतात नोकरी आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून रात्रीचा वेळ अध्यात्मामध्ये दंग राहत. रात्री सोनापूर येथील शिवमंदिरात ते एका पायावर उभे राहून पहाटेपर्यंत शिवमंत्राचा जप व ध्यान करीत असत. पुढे घरी परतल्यावर नाममात्र झोप घेऊन पुन्हा दैनंदिन कामकाजाकडे वळत असत. कित्येक वर्षे हा नित्यक्रम विनाव्यत्यय चालू होता. पुढे काही दिवसांनी श्रीशंकराने त्यांना स्वप्नदृष्टांतात सांगितले, ‘‘हे रामचंद्रा, गृहस्थाश्रमी जीवन सांभाळून निश्चयपूर्वक केलेली उपासना आणि प्रसंगी हठयोग्यालाही मागे सारील अशी तपश्चर्या पाहून मी तुजवर प्रसन्न झालो आहे. अक्कलकोट येथे ‘श्रीस्वामी समर्थ’ या सगुणावतारात मी तुझी वाट पाहत आहे. त्यांच्या रूपाने मी तुझे सद्गुरुत्व स्वीकारीन. तुझी साधना पूर्ण झाली. तुला समाधी स्थितीतून मुक्तीचा सोहळा उपभोगण्याचे भाग्य लाभेल. ऊठ. त्वरेने अक्कलकोट येथे कुटुंब-परिवारासह निघण्याचे कर. मी श्रीस्वामी समर्थ स्वरूपात तुझी वाट पाहत आहे.’’
दृष्टांतानुसार श्रीतात महाराज सहकुटुंब अक्कलकोटास गेले. तेथे त्यांना श्रीस्वामी समर्थांच्या ठायी साक्षात श्रीशंकराचे दर्शन घडले. श्रीतात आश्चर्यचकित झाले. पुढे श्रीस्वामी समर्थ मूळ रूपात प्रकट होत श्रीतात यांच्या हृदयावर उजवा हात ठेवून म्हणाले, ‘‘अब हम तुम्हारे मे आ गये.’’ तोच श्रीतात निर्विकल्प समाधीत गेले. पुढे श्रीस्वामी समर्थांच्या हाताचा ठसा श्रीतात यांच्या हृदयावर अखेरपावेतो दिसत राहिला. अक्कलकोट येथील वास्तव्यात श्रीतात यांना श्रीस्वामी समर्थांचे अखंड सान्निध्य लाभले. सहजसमाधी योग आणि आध्यात्मिकतेची पूर्णावस्था श्रीस्वामी समर्थांनी श्रीतात यांना प्राप्त करून दिली. श्रीस्वामी समर्थांच्या सान्निध्यात महिनाभर राहिल्यानंतर श्रीतात यांना माघारी परतण्याची आज्ञा झाली. येथून पुढे श्रीतात महाराजांचा लौकिकातील प्रपंच संपला आणि अलौकिक कार्याचा प्रारंभ झाला.
श्रीतात महाराजांना अष्टसिद्धी अवगत होत्या. मात्र तरीही त्यांनी घातलेली भक्तियोगाची आणि कर्मयोगाची सांगड अपूर्व होती. अष्टसिद्धी हाताशी असतानाही त्यांचा वापर त्यांनी कधी वैयक्तिक स्वार्थाकरिता केला नाही. साधना, तपश्चर्या आणि श्रीस्वामी समर्थकृपेने ब्रह्मसाक्षात्कार अनुभवल्यावरही ते सर्वसाधारण आयुष्य जगले. आपल्यातील सिद्धीची जाणीव समाजाला होऊ न देण्याची दक्षता घेतली. मुमुक्षू साधक भेटल्यास त्याला आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी केले.
मृतसंजीवन, असाध्य रोगातून मुक्ती, शरण आलेल्या भक्तांचे व शिष्यांचे प्रारब्ध त्यांची योग्यता पाहून स्वतःवर घेणे या आणि अशा अनेक लीला श्रीतात महाराजांनी केल्या. कुणी व्याधिग्रस्त, समस्याग्रस्त आल्यास श्रीतात महाराज स्वहस्ते त्याच्या हातावर पाणी ओतत आणि त्याचवेळी ‘श्रीस्वामी समर्थ’ या दिव्य मंत्राचे उच्चारण करून पुढे ते मंत्रयुक्त पाणी स्वतःच प्राशन करीत असत. अशा तऱहेने कित्येक भक्तांच्या शारीरिक व्याधी, दुर्धर रोग, दुदैवी भोग ते स्वतःवर घेत असत.
रामचंद्र व्यंकटेश भेंडे (बेरडकर) या पूर्वाश्रमीच्या गृहस्थाला ‘श्रीतात महाराज’ ही नाममुद्रा लाभली ती त्यांचे शिष्य बाळकृष्ण महाराज सुरतकर यांच्यामुळे. याच बाळकृष्ण महाराजांनी मुंबईच्या दादर परिसरात श्रीस्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्यांनीच त्यांचे जे सद्गुरू रामचंद्र व्यंकटेश भेंडे (बेरडकर) यांना ‘श्रीतात महाराज’ नावाने संबोधण्यास प्रारंभ केला. आर्य समाजाच्या दयानंद सरस्वतींचे शिष्यत्व पत्करलेले बाळकृष्ण महाराज नास्तिक होते. जेव्हा ते श्रीतात महाराजांच्या संपर्कात आले तेव्हा त्यांना श्रीतात यांनी मुंबादेवीच्या दर्शनास नेले, परंतु गाभाऱयापाशी जाताच बाळकृष्णांना देवीची मुद्रा रौद्ररूपात दिसू लागल्याचे पाहून त्यांच्यातील नास्तिकता लोप पावली. त्यांनी श्रीतात महाराजांकडे क्षमायाचना केली. तेव्हा श्रीतात यांनी बाळकृष्ण यांना देवीकडे पाहावयास सांगितले. बाळकृष्ण यांना देवीचा चेहरा प्रसन्न व हसरा दिसत होता. या एकाच प्रसंगाने बाळकृष्ण अन् श्रीतात यांच्यामध्ये गुरुशिष्याचा भावबंध निर्माण झाला. त्यांनी बाळकृष्णांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचे गुरुपद स्वीकारले. त्यांना श्रीस्वामी समर्थस्वरूपाचा परिचय करवून दिला. आणि आठ दिवस समाधीसुखात निमग्न ठेवून व नंतर मार्गदर्शन करून श्रीस्वामी संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष बनविले.
बाळकृष्ण महाराज बुद्धिनिष्ठ असल्याने प्रत्येक गोष्टीत शंका काढीत अन् श्रीतात महाराज योग्य समयी त्यांचे अनुभूतीने निरसन करीत. एकदा बाळकृष्ण महाराजांनी ‘‘हनुमंताच्या रोमारोमातून ‘राम’ हा ध्वनी येत असे’’ असा उल्लेख रामायणात वाचला तेव्हा त्यांना शंका आली की, वाचेने नामस्मरण चालू असताना ध्वनी येणे शक्य आहे, परंतु रोमारोमांतून ध्वनी कसा निघेल? हे कोडे श्रीतात यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले व तेथील उशी बाळकृष्णांच्या कानशिलावर मारली. बाळकृष्णांना त्या निर्जीव उशीतून ‘स्वामी’ हा ध्वनी ऐकू येताच ते आश्चर्यचकित झाले. तेव्हा श्रीतात म्हणाले, ‘‘थोडेसे तप आणि श्रीस्वामीकृपेने जर मजसारख्या सामान्य माणसाची उशी गुरुचिंतनाचा ध्वनी करते तर चराचरांत ‘राम’ पाहणाऱया हनुमंताच्या रोमारोमातून ‘राम’ का ऐकू येणार नाही?’’
श्रीतातमहाराज वर्णाने सावळे होते. त्यांचे तपश्चर्येने तावून सुलाखून निघालेले उंच व सडपातळ शरीर अतिशय तेजःपुंज दिसत असे. त्यांचे डोळे इतके भेदक होते की, त्याकडे थेट पाहण्याची शक्ती फारच थोडय़ा भाग्यवंतांपाशी होती. ‘‘श्रीतात महाराजांसारखा गोड आवाज आम्ही उभ्या आयुष्यात कुणाचाही ऐकलेला नाही’’ असे बाळकृष्ण महाराज नेहमी म्हणत असत. जेव्हा श्रीतात महाराज समाधीवस्थेत असत तेव्हा त्यांच्या देहातून अलौकिक असा दैवी सुगंध दरवळत असे.
श्रीतात महाराजांनी सरकारी मुद्रणालयात पेन्शन घेईतोवर नोकरी केली. सेवानिवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य बेळगावमध्ये श्रीस्वामी चिंतनात व्यतीत करणाऱया श्रीतात महाराज यांच्या अवतारकार्याची समाप्ती त्यांच्याच इच्छेनुसार अज्ञातावस्थेत झाली.





























































