
>> विवेक दिगंबर वैद्य
गर्भगिरी परिसरात अनेक ज्ञात-अज्ञात गुंफा आहेत. अशाच एका गुंफेमध्ये श्रीशंकर महाराज (धनकवडी) यांनी त्यांचे शिष्य डॉ. धनेश्वर यांना त्यांच्या पूर्वायुष्यातील साधना करण्याची जागा (आसन) दाखविली होती. श्रीशंकर महाराजांचा नगर जिल्ह्याशी अन्योन्य संबंध आहे. अघोरशास्त्री लिखित ‘श्रीशंकरगीता’ ग्रंथातील श्रीशंकर महाराजांच्या संकलित आठवणींमध्ये नगर जिह्यातील वृद्धेश्वर, मिरी आदी स्थानांचा उल्लेख येतो. श्रीगहिनीनाथ व श्रीमीननाथ यांची भेट झाल्याचा संदर्भही याच परिसराशी निगडित आहे.
नगर जिह्यातील गर्भगिरीचा परिसर आदिनाथ श्रीशंकर आणि नवनाथ यांचे पौराणिक माहात्म्य जसे जागवतो तसेच या सहस्रकाच्या पूर्वार्धातील ज्ञानेश्वरादी संतश्रेष्ठांची ओळखही रुजवतो. नाथ संप्रदाय परंपरेला पुढे नेणाऱया निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ अर्थात श्रीज्ञानेश्वरांनी पुढे वारकरी संप्रदायामध्ये आपले वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण केले आणि तिथूनच संत मांदियाळीची परंपरा दिमाखात उभी राहिली. याच संतपरंपरेमध्ये कर्ममार्गाचे ‘अधिष्ठान’ स्वीकारणाऱया समर्थ रामदास स्वामींचे सान्निध्यदेखील गर्भगिरी परिसराला लाभले.
श्रीरामदास स्वामींच्या अंतरंगातील निवडक शिष्यांपैकी एक आणि मूळचे तिसगाव येथे जन्मलेले श्रीदिनकर स्वामी वयाच्या चोविसाव्या वर्षी गर्भगिरी पर्वतरांगांमधील वृद्धेश्वर क्षेत्री आले आणि शके 1575च्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी गायत्री पुरश्चरणास प्रारंभ केला. पुढे काही काळानंतर त्यांना श्रीरामरायाचा दृष्टांत घडला आणि त्यायोगे थोडक्या अवधीतच वृद्धेश्वर येथे श्रीरामदास स्वामींचे शिष्यांसमवेत आगमन झाले. समर्थ श्रीरामदासांनी वृद्धेश्वराच्या साक्षीने श्रीदिनकर स्वामींना अनुग्रह दिला आणि तिसगाव येथे स्थापन केलेल्या रामदासी मठाचा पुढे मठाधिपतीदेखील केले. समर्थ संप्रदायातील वैशिष्टय़पूर्ण अशा ‘स्वानुभव-दिनकर’ या अलौकिक व अतुल्य ग्रंथाचे लेखन करणाऱया श्रीदिनकर स्वामी यांनी त्यांच्या धर्मकार्याचा प्रारंभ श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे केला हे वृद्धेश्वराचे आणखी एक स्थानमाहात्म्य आहे.
श्रीदिनकर स्वामी यांनी वृद्धेश्वर क्षेत्राचे वर्णन एका अष्टकामध्ये ‘गिरी खळी दरकुटय़ा कुहरे शिखरेही। गवी गडी दरी गुहा गव्हरे भुयरे ही।। जळमळीत तडागे साजिरे कूप बावी। सरोवरे विहिरे ही रम्य टाकी असावी।। अमळ जळ तुटेना खंड वोघी पडेना। परम सुरस ऐसे स्थान कोठे दिसेना।।’ अशा शब्दांत केले आहे. या अष्टकामध्ये त्यांनी वृद्धेश्वर क्षेत्र परिसरातील डोंगर, घनगर्द जंगल, वृद्धगंगा, जलाशय, गिरी-गव्हरे आणि गुंफा-भुयारांचे वर्णन केले आहे. रामदासी वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक पूज्य शंकरराव देव यांचे श्रीदिनकर स्वामी यांच्या व्यक्तित्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा शोध घेण्याच्या निमित्ताने वृद्धेश्वर परिसरात वास्तव्य झाले तेव्हा येथील डोंगरराजीत लपलेल्या रमणीय निसर्गरम्य परिसराचे वर्णन त्यांनीदेखील ‘स्वानुभव-दिनकर’ या ग्रंथाच्या नव्या आवृत्तीतील प्रस्तावनेत केले आहे.
गर्भगिरी परिसरात अनेक ज्ञात-अज्ञात गुंफा आहेत. अशाच एका गुंफेमध्ये श्रीशंकर महाराज (धनकवडी) यांनी त्यांचे शिष्य डॉ. धनेश्वर यांना त्यांच्या पूर्वायुष्यातील साधना करण्याची जागा (आसन) दाखविली होती. श्रीशंकर महाराजांचा नगर जिह्याशी अन्योन्य संबंध आहे. अघोरशास्त्राr लिखित ‘श्रीशंकरगीता’ ग्रंथातील श्रीशंकर महाराजांच्या संकलित आठवणींमध्ये नगर जिह्यातील वृद्धेश्वर, मिरी आदी स्थानांचा उल्लेख येतो. श्रीगहिनीनाथ व श्रीमीननाथ यांची भेट झाल्याचा संदर्भही याच परिसराशी निगडित आहे.
मूळचे ‘मिरी’ गावचे सरदार नानासाहेब मिरीकर हे श्रीशंकर महाराजांच्या भक्तांमधील अग्रणी नाव. त्यांचे बंधू शिर्डीवासी श्रीसाईबाबांचे भक्त होते. नगरकर भक्तांना श्रीशंकर महाराज ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ जाणून घेण्यास सांगत आणि त्यांच्याकडून ‘ज्ञानेश्वरी’चा अभ्यास करवून घेत. नगर येथे सुज्ञ, जाणकार अभ्यासकांनी एकत्र येऊन ‘ज्ञानेश्वरी’च्या अभ्यासाकरिता संस्था स्थापन केली. ‘ज्ञानेश्वरी’चे नित्य वाचन, चिंतन, मनन, समीक्षा व टीकालेखन करणे हे या संस्थेचे प्रमुख कार्य होते. संस्थेच्या वतीने तत्कालीन मान्यवर अभ्यासकांनी ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथावर केलेले अभ्यासपूर्ण संशोधन पुढे दोन विस्तृत ग्रंथांमध्ये प्रसिद्ध झाले.
नगर जिह्यात वांबोरीतीर्थ नावाचे क्षेत्र हे मूळचे वाल्मीक तीर्थ. येथे काही काळ महर्षी वाल्मीकीचे वास्तव्य झाल्याने ‘वाल्मीकतीर्थ’ म्हणून प्रसिद्ध झालेले हे स्थान ‘वांबोरी’ गावात असल्याने पुढे ‘वांबोरीतीर्थ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. पूर्वी हा दंडकारण्याचा भाग असल्यामुळे साहजिकच रामायण काळाशी संबंधित होता. येथे अनेक ऋषीमुनींचे आश्रमदेखील होते. येथील विशाल औदुंबर वृक्षाखाली गोरक्षनाथ यांना ‘वामतीर्थ’ नावाची पुष्करणी आढळली. या पुष्करणीमध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ यांनी स्नान केल्याचे सांगितले जाते. वाम किंवा वांब अर्थात ‘अद्भुत पौराणिक माहात्म्य लाभलेल्या येथील ‘वामतीर्थ’रूपी विहिरीवरून या गावाचे नाव ‘वांबोरी’ किंवा ‘वामोरी’ झाल्याचे सांगण्यात येते. म्हणूनच येथे वास्तव्यास असलेले श्रीस्वामी समर्थभक्त वामन रावजी वैद्य हे ‘वांबोरीकर’ किंवा ‘वामोरीकर’ या उपनावाने ओळखले जाऊ लागले. वांबोरी येथे काही काळ राहिलेल्या व नगर येथून प्रसिद्ध होणाऱया ‘वृत्तवैभव’ वृत्तपत्रात काम करणाऱया वामनबुवा वांबोरीकरांनी पुढे ‘श्रीगुरुलीलामृत’ हा सांप्रदायिक ग्रंथ लिहून ‘वांबोरी’ गावाचे स्थानमाहात्म्यही वाढविले.
याच श्रीस्वामी समर्थांच्या नामगजराने दुमदुमणारी वास्तू नगरच्या गुजरगल्ली परिसरात दिमाखाने उभी आहे.
सुप्रसिद्ध पिंगळा ज्योतिषी पूज्य नानाजी बापूजी रेखी यांच्या राहत्या घरी सन 1872 मध्ये ‘श्रीस्वामी समर्थांचा पहिला सांप्रदायिक मठ’ स्थापन झाला. सन 1869 मध्ये नानाजी रेखींना त्यांच्या घरी लाकडी खांबातून प्रकटलेल्या नाथ संप्रदायी वेषातील मुलाच्या रूपात श्रीस्वामी समर्थ दर्शन घडले. या बालकाने नानाजींच्या पत्नी सखूबाईंकडे भिक्षा मागितली व भिक्षा मिळताच तो अंतर्धान पावला. पुढे नानाजी रेखींचा परिचय श्रीस्वामी समर्थ संप्रदाय स्थापना करणाऱया श्रीस्वामीसुत महाराजांशी झाला. त्यांच्या सूचनेनुसार नानाजींनी श्रीस्वामी समर्थांची पुंडली तयार केली तेव्हा त्यांच्या हाताच्या तळव्यावर श्रीस्वामी समर्थांनी आनंदाने साक्षात विष्णुपद उमटवले. नानाजींच्या घरी श्रीलक्ष्मीनारायण मंदिर गाभाऱयात श्रीस्वामी पादुकांची स्थापना करण्यात आली. येथील वास्तव्यादरम्यान श्रीस्वामीसुतांना स्फुरलेले अभंग नानाजी रेखी यांनी स्वहस्ताक्षरांत लिहून घेतले आणि या अभंगाचे हस्तलिखित दयानंद व अजित या रेखी बंधूंनी ‘दुर्मिळ स्वामी संचित’ म्हणून अजूनही जपून ठेवले आहे.

























































