स्त्री मनाचे गहिरे चित्रण करणाऱ्या सिद्धहस्त कथाकार

>> विवेक सावरीकर ‘मृदुल’

हिंदी आणि मराठी या दोनही साहित्य प्रकारात आपल्या लेखनाचा अवीट ठसा उमटविणाऱया पद्मश्री मालती जोशी म्हणजे सिद्धहस्त कथाकारच होत्या. प्रामुख्याने आपल्या कथाविश्वातून त्या स्त्री मनाचा वेध घेत राहिल्या. तिच्या मनाचे गहिरे रंग लेखणीतून चितारीत राहिल्या. साहित्याचे विविध प्रकार हाताळण्याचा छंद मालतीजींना लागला. मात्र कथा लेखनात त्यांचे मन इतके रमले की, उर्वरित आयुष्य त्यांनी मुख्यत्वे कथा लेखनालाच समर्पित केले. आज त्या आपल्यात नसल्या तरी हिंदी-मराठी कथा व कादंबऱयांच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्यामध्ये राहतील.

पद्मश्री मालती जोशी यांचे 15 मे रोजी 90 वर्षांच्या उंबरठय़ावर दिल्ली येथे निधन झाले. छत्रपती संभाजीनगरच्या दिघे कुटुंबात 4 जून 1934 रोजी त्यांचा जन्म झाला. वडील कृष्णराव दिघे हे त्या वेळच्या मध्य प्रांताचे (सी पी अॅण्ड बरार) न्यायाधीश होते. त्यामुळे योगायोगाने मायबोली मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत प्रावीण्य मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या. इंदूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना गीत लेखनाने मालती दिघे-जोशी यांनी हिंदी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले. खूप कवी संमेलने गाजवली. सुंदर ओघवती भाषा, काव्यरसाची उत्तम समज आणि सादर करणारा गोड गळा. रसिकांनी ‘मालव की मीरा’ म्हणून या तरुण आणि तेजस्वी कवयित्रीचे भरभरून कौतुक केले. कालांतराने कविता मागे पडली. साहित्याचे विविध प्रकार हाताळण्याचा छंद मालतीजींना लागला. मात्र कथा लेखनात त्यांचे मन इतके रमले की, उर्वरित आयुष्य त्यांनी मुख्यत्वे कथा लेखनालाच समर्पित केले. आपल्या कथाविश्वातून त्या स्त्राr मनाचा वेध घेत राहिल्या. तिच्या मनाचे गहिरे रंग लेखणीतून चितारीत राहिल्या.

विशेष म्हणजे हिंदीतून विपुल लेखन करतानाही मालतीबाईंनी मायबोलीची कास कधीच सोडली नाही. मराठीत त्यांनी जवळ-जवळ 11 पुस्तके लिहिली आहेत. पैकी पाच बालकथासंग्रह, एक गीतसंग्रह, तीन कादंबऱया आणि एक-दोन विनोदी कथासंग्रह आहेत. मालती जोशी यांच्या ‘पाषाण’ या संग्रहाला 1994 साली तत्कालीन महाराष्ट्र शासनाचे बक्षीसही मिळाले आहे. 2018 साली भारताचे तेव्हाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा हस्ते मालती जोशी यांना पद्मश्री या देशाच्या श्रेष्ठ पुरस्काराने गौरवले गेले. देशभरातील अनेक शोधार्थ्यांनी मालती जोशी यांच्या कथांवर पीएचडी मिळवली आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर बऱयाच कथांची नाटय़ रूपांतर प्रसारित झाली आहेत. सांगायचेच झाले तर गुलझार यांच्या ‘किरदार’ या मालिकेत मालतीबाईंच्या दोन कथा होत्या, तर जया बच्चन यांनी त्यांच्याच सात कहाण्यांवर ‘सात फेरे’ ही मालिका सादर केली होती. रंगमंचावर मधुकर तोडरमल यांनी नाटक ‘ऋणानुबंध,’ तर सच्चिदानंद जोशी यांनी नाटक ‘एक कर्ज, एक अदायगी’ सादर केले. ही दोन्ही नाटपं मालती जोशी यांच्या कथांवर आधारित होती.

16 मेची सकाळ मालती जोशी यांच्या दुःखद निधनाची बातमी घेऊनच आली होती. मी भोपाळहून दिल्लीला त्यांचे धाकटे चिरंजीव आणि माझे जीवश्च पंठश्च नाटय़ मित्र सच्चिदानंद जोशी याला मोबाईलवरून कॉल केला खरा, पण सांत्वन कसे करू हे काही सुचत नव्हते. मी बराच वेळ स्तब्ध बसलो होतो. नव्वदच्या दशकातील मालती कापूंची प्रथम भेट आठवून गेली. सच्चिदानंद आणि त्याची पत्नी मालविका हे माझे व माझ्या पत्नीचे रंगमित्र होते, पण मालती जोशी यांना मी सुरुवातीला एक ज्येष्ठ कथाकार म्हणून अधिक आणि वेगळय़ाने ओळखत होतो. लहानपणापासून साप्ताहिक ‘धर्मयुग’मध्ये त्यांच्या कथा वाचत आलो होतो. कॉलेजच्या ग्रंथालयात त्यांचे काही कथासंग्रह वाचले होते. दैनिक ‘नईदुनिया’ या वर्तमानपत्रात फीचर संपादक पदावर असताना एकदा त्यांना औपचारिकरीत्या भेटायला गेलो होतो. कामही जरा निकडीचे होते. आमच्या वर्तमानपत्रात मालती जोशी यांचा एक साप्ताहिक स्तंभ सुरू व्हावा असा मुख्य संपादकांचा आदेश होता. मी त्यांच्या घरी जरा भीत-भीतच ‘‘काकू आमच्या वर्तमानपत्रासाठी एखादा स्तंभ लिहाल का?’’ विचारून टाकले. त्यांनी जेव्हा ‘‘बरं पाहते’’ म्हटले तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विशेष आनंद या गोष्टीचा होता की, तुमचे मानधन किती राहील? या प्रश्नांची गरजच पडली नव्हती. त्याच स्मितहास्य करत म्हणाल्या होत्या, ‘‘तुम्हाला जे द्यायचे असेल ते मानधन द्यावेत. बरोबर एक महिन्याने मालती कापूंची टपाल वर्तमानपत्राच्या फीचर डेस्कवर मिळाली होती. चार आठवडय़ांसाठी आगाऊ स्तंभ लिहून पाठवले होते. सोबत एक चिट्ठी होती, प्रियवर, आपके सतत अनुरोध की रक्षा करते हुए चार सप्ताह की सामग्री भेज रही हूं. कालम का नाम रखना चाहूंगी ‘सरे राह चलते चलते’. हा स्तंभनंतर खूप प्रसिद्ध झाला, हे सांगणे न लगे.

नंदू आणि माझी नाटय़ मैत्री जशजशी बळकट होत गेली, मालती जोशी माझ्यासाठी लेखिका कमी मालती काकू अधिक होत गेल्या. मध्य प्रदेश शासनाचा शिखर सन्मान, भवभूती अलंकरण, अहिंदीभाषी लेखिका सन्मान असे एकेक सन्मान कापूंच्या झोळीत पडत होते. पण त्यांच्या व्यवहारात कुठलाही मोठेपणा त्यांनी कधीच जाणवू दिला नाही. मी पाहिलंय कुणीही त्यांच्या घरी गेले की, त्याला चहापाणी दिल्याशिवाय त्या निघू देत नसत आणि विशेष म्हणजे कधीही जा, अभिरुची संपन्न कापूंच्या सुरेख कॉटन साडीची ग्रेस व प्रेमळ स्मितहास्य मन अगदी प्रसन्न करून जाई. आपण एका प्रथितयश लेखिकेशी बोलतोय, असे आखडल्यासारखे तर कधी वाटायचेच नाही. मी तर कुठल्याही वेळी त्यांच्या घरी जायचो. आधीतर तालमींच्या निमित्ताने आणि नंतर एकाच विद्यापीठात सच्चिदानंद कुलसचिव असताना त्यांच्या सोबत सहाय्यक कुलसचिव पदावर रुजू झाल्यानंतर दप्तरी कामानेदेखील. नेहमी नीटनेटके प्रेझेंटबल राहणे आणि सर्वांशी मनमोकळेपणाने बोलणे ही तर मालती कापूंच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष खूण. अगदी शेवटपर्यंत माझ्या आठवणीतल्या मालती काकू तशाच राहिल्या आहेत. सहज, सोज्वळ आणि दर्शनीय.

तसेच मालती जोशी यांचे एक अभिनव वैशिष्टय़ म्हणजे आपल्या सर्व कथा त्यांना अगदी मुखोद्गत असायच्या. त्यांचे कथाकथन ऐकण्यासारखे असे. कथा सांगताना त्यांना कधीच वही, डायरी किंवा कागदाची गरज पडली नाही. यूटय़ूबवर त्यांचे कथाकथनाचे अनेक व्हिडीओ याची ग्वाही देतील. आज मालतीबाई जोशी देह रूपाने आपल्यामध्ये नाहीत तरी आपल्या हिंदी-मराठी कथा व कादंबऱयांच्या माध्यमाने त्या नेहमीच आपल्यामध्ये राहतील, हे नक्की.

(लेखक मध्य प्रदेशातील सुपरिचित रंगकर्मी आणि कवी आहेत.)

[email protected]