1 सप्टेंबरपासून आवाजावरून कोरोना चाचणी सुरू, देशातील पहिला प्रयोग ‘नेस्को’ सेंटरमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी आवाजावरून कोरोना चाचणी करण्याच्या प्रयोगाला 1 सप्टेंबरपासून गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सुरुवात होणार असून देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रयोग आहे. त्यासाठी नेस्कोतील 500 कोरोना रुग्णांच्या आवाजाचे नमुने गोळा केले जाणार असून त्याचा संपूर्ण अहवाल चार महिन्यांत पालिकेला सादर होणार आहे. इस्रायलच्या मदतीने केल्या जाणाऱया या अभ्यास प्रयोगात 30 सेकंदांत कोरोनाचे निदान करणे शक्य होणार आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी विविध तपासणी पद्धतींचा वापर मुंबई महानगरपालिका करत आहे. यात थर्मल गनने तापमान मोजणे, ऑक्सिमीटरने रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासणी करणे आणि संशयित रुग्ण असल्यास ‘आरटी-पीसीआर’ आणि अँटिजेन चाचणी करून कोरोनाचे निदान केले जात आहे. मात्र आता अँटिजेनपेक्षाही अधिक वेगाने कोरोनाचे निदान करण्यासाठी व्हॉईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटिलीजन्स म्हणजे आवाजावरून कोरोनाचे निदान करण्याची पद्धत इस्रायलने विकसित केली असून त्याचा प्रयोग नेस्को कोरोना सेंटरमध्ये केला जाणार आहे. या पद्धतीने कोरोना रुग्णांचे निदान झटपट होणार आहे. ही पद्धत अधिक खात्रीशीर आहे असे प्रयोगात सिद्ध झाले तर त्याचा वापर मुंबईत कोरोना चाचणीसाठी केला जाणार आहे.

80 टक्के अचूकता
कोरोनाचे निदान झटपट करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलमध्ये या पद्धतीने चाचणी केली जाते. या आवाजी चाचणीनंतर लक्षणे असलेल्या रुग्णांची अँटिजेन किंवा ‘आरटी-पीसीआर’ कोरोना टेस्ट केली जाते. दोन्ही पद्धतींमधून त्याच प्रमाणात रुग्णांची लक्षणे ठळकपणे दिसतात का, याची तुलना केली जाते. या चाचणीत 80 टक्क्यांपर्यंत अचूकता आहे, असा दावा ‘व्होकोलिस हेल्थ’ या इस्रायली कंपनीने केला आहे. मुंबई महानगरपालिकेने या कंपनीबरोबर 22 ऑगस्टला प्रयोगासाठी करार केला आहे.

तुलनात्मक अभ्यास
नेस्कोमधील 500 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आवाजाचे नमुने इस्रायली कंपनीच्या मोबाईल ऍपचा वापर करून घेतले जातील. त्याचबरोबर या कोरोना रुग्णांचे या आधीचे आरटी-पीसीआर चाचणीद्वारे जमा केलेले नमुने, रुग्णांची सर्व माहिती, कोरोना अहवाल, एक्स रे इस्रायलमधील कंपनीला पाठवले जातील. नव्या आवाजी चाचणीतून मिळालेले निष्कर्ष आणि रुग्णांचे आधीच नमुने यांचा तुलनात्मक अभ्यास करून कंपनी पालिकेला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतरच या पद्धतीचा वापर करायचा की नाही हे पालिका ठरवणार आहे.

मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजीत नमुने
इस्रायलमध्ये कंपनी हिब्रू आणि इंग्रजीत नमुने गोळा करते, मात्र मुंबईत मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये नमुने गोळा केले जाणार आहेत. रुग्णाला यात या चारपैकी कोणत्याही एका भाषेत 1 ते 20 पर्यंतचे आकडे मोजावे लागतील तर पाच वेळेला खोकायचे आहे. या दोन्ही आवाजाच्या नमुन्यावरून कोरोनाची लक्षणे आहेत का, लक्षणे असतील तर ती सौम्य, मध्यम किंवा गंभीर आहेत हे तपासातून समजणार आहे.

‘हा ‘लर्निंग इक्सरसाइज’ असून कंपनीच्या ऍपला रुग्णांची सगळी माहिती दिली जाईल, पण नावे गुप्त ठेवली जाणार आहेत. कंपनीच्या दाव्याप्रमाणे हे मोबाईल ऍप असल्यामुळे घरात, घराबाहेर, ऑफिस, विमानतळावर अगदी कुठेही याचा अगदी सहज वापर करता येईल. त्यामुळे रुग्णांबरोबर आरोग्य यंत्रणांचाही प्रचंड वेळ वाचेल. कंपनीने चार महिन्यांनंतर अहवाल दिल्यानंतर तुलनात्मक अभ्यासात किती टक्के अचूकता आहे, यावरून हा प्रयोग पुढे मुंबईत राबवयचा का नाही याचा निर्णय घेतला जाईल.’
– डॉ. नीलम अंद्राडे, अधिष्ठाता, नेस्को कोरोना सेंटर्स