मतदान करा अन् खरेदीवर सवलत मिळवा, मालेगावात कापड व्यापारी संघटनेची योजना

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा म्हणून मालेगाव कापड व्यापारी संघटनेने जागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. मतदान करा आणि खरेदीवर विशेष सवलत मिळवा, अशी योजना जाहीर केली आहे.

मतदानाचे महत्त्व नवमतदारांसह सर्व नागरिकांना समजावे यासाठी मालेगाव महापालिका विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त पल्लवी शिरसाठ यांनी महापालिका क्षेत्रातील कापड व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करावे, याबाबतचे फलक दुकानात दर्शनी भागात लावावेत, असे सांगितले. मतदान करून येणाऱ्या ग्राहकांसाठी खास सवलत योजना जाहीर करावी, असेही सूचवले. त्याला संघटनेचे अध्यक्ष संजय सोनजे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.