दापोलीत सोमवारी ईव्हीएम मतमोजणी; प्रशासनाची तयारी पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या १२ गणांसाठी झालेल्या निवडणुकीची ईव्हीएम मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जयकुमार सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अर्चना बोंबे (घोलप) , पोलिस निरीक्षक महेश तोरसकर , नायब तहसीलदार शरद आडमुठे उपस्थित होते.

मतमोजणीसाठी एकूण १४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून पोस्टल मतमोजणीसाठी स्वतंत्र चार टेबल लावण्यात आले आहेत. मतमोजणीला केळशी गटापासून सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दापोली तालुक्यात एकूण १ लाख ४० हजार ५५८ मतदार असून त्यापैकी ७५ हजार ७१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात पुरुष मतदार ३५ हजार ६४५ तर महिला मतदार ४० हजार ७२ आहेत. एकूण मतदानाचा टक्का ५३.८६ इतका नोंदवण्यात आला.

दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान शांततेत पार पडले असून मतमोजणी प्रक्रियाही पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती तहसीलदार अर्चना बोंम्बे घोलप यांनी दिली.