
नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर ईव्हीएम मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँग रूम परिसरातील घरांचेही सीसीटीव्ही निवडणूक अधिकाऱयांकडून सक्तीने काढून टाकण्यात आले आहेत. हा मुद्दा कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केल्यानंतर त्यावरून सभागृहाबाहेर चर्चा रंगली आहे. मतचोरी करण्याचा इरादा तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सतेज पाटील यांनी विधान परिषदेत यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव नगरपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ईव्हीएम तेथील मराठा सांस्कृतिक भवनाच्या हॉलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्या हॉलसमोर राहणाऱया मोरे नावाच्या व्यक्तीच्या घराचे सीसीटीव्ही सीईओ सुमित जाधव यांनी पोलीस बंदोबस्तात काढून टाकले, अशी माहिती सतेज पाटील यांनी सभागृहाला दिली. इतकेच नव्हे तर स्ट्राँग रूमवर सतत नजर ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने कार्यान्वित केलेले सीसीटीव्ही कॅमेरेही काढण्यात आले. या प्रकरणी अधिकाऱयांची चौकशी केली जावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याला उत्तर देताना या घटनेमागील सर्व परिस्थितीची पडताळणी करून सविस्तर चौकशी केली जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले.






























































