वडाळा-जेकब सर्कल मोनो पुढच्या आठवड्यात धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

बहुप्रतीक्षित वडाळा-जेकब सर्कल मोनोरेल पुढच्या आठवड्यापासून ट्रकवर येणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन येत्या 27 किंवा 28 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोनोरेलच्या या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन उरकले जाणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिवरणाच्या (एमएमआरडीए) वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली. वडाळा ते चेंबूर असा मोनोरेलचा पहिला टप्पा फेब्रुवारी 2014 पासून सुरू झाला, परंतु त्या मार्गावर प्रवाशांना आकर्षित करण्यास मोनोरेल फेल गेली आहे. परिणामी रोज 6 लाख 40 हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. दुसरा टप्पा फायदेशीर ठरेल असा विश्वास या अधिकार्‍याने व्यक्त केला.

4 मार्चपासून निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेच्या काळात कोणतीही उद्घाटने करता येत नाहीत. त्यामुळे तत्पूर्वीच मोनोरेलचे उद्घाटन केले जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यासाठी चार नादुरुस्त मोनोरेल गाड्यांची दुरुस्ती केली गेली आहे. अजून 10 नव्या गाड्या घेऊन मोनोरेलच्या दोन्ही टप्प्यांवर 19 गाड्या चालवण्याचा विचार असल्याची माहितीही या अधिकार्‍याने दिली. चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल मार्ग जोडण्यासाठी एमएमआरडीए आणखी पाच नव्या मोनोरेल गाड्या विकत घेणार असून त्यासाठी लवकर च निविदा काढल्या जाणार आहेत.