दंगलीतील फरार आरोपीला 32 वर्षांनी ठोकल्या बेडय़ा

1993 सालच्या मुंबईतील जातीय दंगलीतील फरार आरोपीला 32 वर्षांनी वडाळा पोलिसांनी अटक केली. आरिफ अली हशमुल्ला खान असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. जामिनावर बाहेर येताच तो सुनावणीसाठी गैरहजर होता.

मुंबई 1993 साली जातीय दंगली उसळल्या होत्या. दंगलीप्रकरणी वडाळा पोलिसांनी काही जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता. त्या गुह्यात पोलिसांनी आरिफला अटक केली होती. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर झाल्यावर तो सुनावणीसाठी विशेष सत्र न्यायालयात सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्या विरोधात न्यायालयाने अटकपूर्व वारंट काढले होते. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती. पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशला गेले होते. मात्र तो मिळून येत नव्हता. शोध मोहिमेदरम्यान तो अॅण्टॉप हिल परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अॅण्टॉप हिलच्या दीनबंधू नगर येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.