‘वाडिया’ वाचवण्यासाठी पालिकेचे 14 कोटी, महापौरांच्या बैठकीत निर्णय

386

वाडिया रुग्णालयाच्या प्रशासकीय त्रुटींमुळे पालिका प्रशासनाने रोखून ठेवलेल्या मदतनिधीपैकी 14 कोटींचा मदतनिधी रुग्णालयाला तत्काळ देण्यात आला. मदतनिधीअभावी हे रुग्णालय बंद पडण्याचा धोका होता. हा धोका लक्षात येताच शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. शिवसेनेने दणका देताच पालिकेने वाडिया रुग्णालयाला आज थकीत निधीचा पहिला हप्ता दिला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी बैठक घेऊन हे आदेश दिले. पुढील मदतनिधीही टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे अशी माहितीही महापौरांनी दिली.

लहान मुलांसाठी आणि गरोदर महिलांसाठी प्रसूतिगृह अशी दोन रुग्णालये वाडिया ट्रस्टतर्फे चालवली जातात. या दोन्ही रुग्णालयांतून संपूर्ण मोफत सेवा दिली जाते. लहान मुलांमधील जन्मजात आजारावरील अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही केल्या जातात. त्यामुळे मुंबईसह आशिया खंडात या रुग्णालयाचा नावलौकिक आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत वाडिया रुगालयातील प्रशासकीय त्रुटी आढळत होत्या. त्यामुळे पालिका प्रशासनाने तब्बल 96 कोटींचा निधी रोखून धरला होता. यावर स्थायी समितीतही मोठी खडाजंगी झाली होती. कोणत्याही परिस्थितीत हे रुग्णालय बंद पडू नये अशी भूमिका शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी घेतली होती. आज शुक्रवारी महापौर दालनात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, आमदार अजय चौधरी, सचिन पडवळ, श्रद्धा जाधव, प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बैठक झाली. या बैठकीत 14 कोटींचा निधी वाडिया रुग्णालयाला तत्काळ देण्याचे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. हे रुग्णालय बंद पडू नये म्हणून आमदार अजय चौधरी आणि नगरसेवक सचिन पडवळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

पालिकेच्या मदतनिधीवर (ग्रँट) वाडिया ट्रस्टच्या दोन्ही रुग्णालयांच्या रुग्णांना मोफत सेवा दिली जाते, कर्मचाऱ्यांचे पगारही त्यातून होतात, मात्र पालिका प्रशासनामुळे हे रुग्णालय निधीअभावी बंद पडण्याचा धोका होता. मात्र, शिवसेनेने तत्काळ दोन्ही रुग्णालयांना 7-7 कोटी असे 14 कोटींचा मदतनिधी देऊन हे रुग्णालय बंद पडण्यापासून रोखले. वाडिया रुग्णालय चांगले रुग्णालय असून त्याचा निधी टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे, मात्र त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कामातील त्रुटी दूर करण्यासाठी तत्काळ पावले उचलली पाहिजे- किशोरी पेडणेकर, महापौर

आपली प्रतिक्रिया द्या