सोबती

436

>> विक्रम गायकवाड

सह्याद्री’…. ज्याच्या कुशीत आपला अवघा महाराष्ट्र वसलाय, ज्याच्या आधारावर स्वराज्य फुललंय, त्याच सह्याद्रीने माणसांबरोबरच विभिन्न प्रकारच्या पशुपक्ष्यांनाही आश्रय दिला आहे. आपल्या महाराष्ट्रात लाखो प्रकारच्या पशुपक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. त्यात एक खूप विशेष प्राणीसुद्धा मुबलक आढळतो. तो म्हणजे ‘कुत्रा’.आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की, पशुपक्ष्यांची एवढी विविधता असताना मी अगदीच सगळीकडे दिसणाऱ्या कुत्र्याचं, ज्याला आपण बोली भाषेत ‘गावठी कुत्रा’ म्हणतो, त्याचंच नाव का घेतलं? त्याला कारण आहे. ज्यांना किल्ल्यांवर फिरायला जायला आवडतं आणि सह्याद्रीच्या कुशीत शिरायला आवडतं त्यांना लगेच कळेल मला काय म्हणायचं आहे.

मी खूप किल्ल्यांवर जातो. या सगळ्या गडांच्या पायथ्याला एक गोष्ट हमखास दिसते ती म्हणजे कुत्रे. आपला मोठा ग्रुप असेल तर ते तुमच्याजवळ येणं टाळतात. पण जर तुम्ही एकटे असाल किंवा दोघे-तिघेच असाल तर ते तुमच्याबरोबर चालू लागतात. त्यांनी आपल्याला निवडलेलं असतं आणि ते तुमचे रक्षक आणि वाटाडे म्हणून स्वतःला अपॉइंट करतात. मग आपला प्रवास सुरू होतो. आपण वाटेत दमलो, बसलो की ते आपल्या आजूबाजूला घुटमळतात. पळत-पळत वर जातात. परत खाली येतात. वाटेत एखादं माकड असेल तर त्याच्यावर भुंकून त्याला पळवून लावतात. एखादा साप आडवा जात असेल तर आपल्याला इशारा देतात. एकदा आपण गडावर पोहोचलो की हे गायब होतात. मग मध्येच कुठेतरी दिसतात. आपल्याला वाटतं की, हे आपल्याला सोडून गेले. पण जेव्हा तुम्ही परत उतरायला सुरुवात करता तेव्हा अचानक प्रकट होतात आणि पुन्हा उतरताना आपलं रक्षण करतात. आपण पायथ्याला पोहोचलो की आपला निरोप घेऊन पुन्हा त्या सह्याद्रीच्या कुशीत शिरतात आणि या कुत्र्यांची सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना दिलेलं कुठलंही अन्न ते खात नाहीत. महाराष्ट्रातल्या शेकडो किल्ल्यांवर असे हजारो कुत्रे तैनात आहेत. कुठल्याही अपेक्षेशिवाय.

तसा काही इतिहासात पुरावा नाही, पण मला नेहमी असे मित्र भेटल्यावर वाटतं की जसं आज पोलिसांकडे आणि सैन्याकडे श्वान पथक असतं तसं ते पूर्वीच्या काळी पण असेल का? आणि गेल्या 400-450 वर्षांपासून माणसांना मदत करण्याचा आपला वारसा ते आपल्या पुढच्या-पुढच्या पिढय़ांना सांगत, कुठल्याही माणसाच्या ट्रेनिंगशिवाय शिकवत चालू ठेवला असेल का? असो. इतिहासाविषयी आपण ठोस बोलू शकत नसलो तरी मला असं वाटण्याचं कारण असं आहे की, मी एकदा असाच रायगडावर गेलो होतो. मला पोहोचेपर्यंत दुपार होऊन गेली होती. दुपारी साधारण 3 च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. ठीक दरवाजाच्या दोन-तीनच पायऱया चढल्या असतील तर तिथे मला एक 4 ते 5 महिन्यांच पिल्लू दिसलं. ते एवढं लहान होतं की, माझ्या मनात शंकासुद्धा आली नाही की हे आपल्याबरोबर येईल. मी आणि माझी बायको आम्ही गप्पा मारत-मारत चालत राहिलो. बऱयापैकी चढल्यावर मागून एक बारीकसा भुंकण्याचा आवाज आला. आम्ही मागे पाहिलं तर तेच छोट्टसं पिल्लू मागून पळत-पळत येत होतं. आम्ही थांबलो, पण ते आम्हांला ओलांडून पुढे पळत गेलं. आमच्यापुढे थोडं अंतर जाऊन थांबलं आणि अजूनच जोरजोरात भुंकायला लागलं. आम्ही नीट पाहिलं तर एका झाडाच्या फांदीवर एक माकड बसलं होतं. त्या एवढय़ाशा जिवानं त्या मोठय़ा माकडाला हकलवून लावलं… ‘आमच्यासाठी’.

जेव्हा त्या लहानग्या पिलाला आम्ही बघून न बघितल्यासारखं केलं होतं आणि आपल्याच तंद्रीत गड चढायला सुरुवात केली होती त्याच वेळी त्याने मात्र आमचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती आणि माझा अंदाज सपशेल चुकवला होता. वर पोहोचल्यावर मला वाटलं की, हे छोटं पिल्लू तरी नक्कीच आपण दिलेलं काहीतरी खाईल. पण आश्चर्य म्हणजे तो छोटा जीव कुठल्याच आमिषाला भुलला नाही. कुठल्याच पदार्थाला त्याने तोंडही लावलं नाही. आपल्याला उगाच वाटत असतं की, आपणच आपल्या मुलांवर संस्कार करतो, कारण आपल्याकडे बुद्धी आहे. पण असं नसतं. प्रत्येक प्राणी आपल्या बाळांवर संस्कार करतच असतात.

आम्हाला गडावरून उतरायला बऱ्यापैकी अंधार झाला होता. त्यामुळे आमचं रक्षक पिल्लू जरा जास्तच सतर्क झालं होतं. आम्ही पायथ्याला पोहोचलो. पिल्लू एक-दोनदा भुंकलं. आम्ही त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्याला जवळ घेऊन त्याचे लाड करत त्याला Thank you म्हणेपर्यंतच अचानक आमच्यासमोर 20-25 कुत्रे आले. ते पिल्लू पटकन त्यांच्यात मिसळून गेलं. प्रत्येकाशी मस्ती करू लागलं. एवढया कुत्र्यांना अचानक असं समोर आलेलं बघून आम्ही जरा घाबरलो होतो. पण ते मात्र सगळेच जाम आनंदी झाले होते. त्या क्षणाला मला असं वाटलं की, हे सगळे कुत्रे याचीच वाट बघत होते की काय? कदाचित त्याच्या ट्रेनिंगनंतरचा त्याचा डय़ुटीचा आजचा पहिलाच दिवस असावा आणि त्याने आपलं काम अगदी चोख पूर्ण केलं होतं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या