वक्फ विधेयकाला विरोध, माथेफिरूने शहराचीच लाईट घालवली

वक्फ सुधारणा कायदा 8 एप्रिल 2025 पासून देशभरात लागू झाला. मात्र, त्यानंतर देशभरात वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुस्लीम संघटनांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मोर्चे काढण्यात येत आहेत. याच पार्श्वभुमीवर मुस्लीम संघटनांनी 15 मिनिटांसाठी आपापल्या घरातील लाईट बंद करत विरोध करणार असल्याची घोषणा केली होती. याच दरम्यान उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील वीज कर्मचारी रियाजुद्दीन याने एकाच वेळी 30 ठिकाणांची वीज कापली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुस्लीम संघटनांनी 30 एप्रिलच्या रात्री 9 ते 9.15 या वेळेत लाईट बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र वीज कर्मचारी रियाजुद्दीनने 30 ठिकाणांची वीज कापल्यामुळे इस्लामाबाद, लोहिया नगर, अहमदनगर आणि जली कोठी या भागांमध्ये अंधार पसरला होता. यावेळी रस्त्यावरील वीज सुद्धा बंद करण्यात आली होती. त्यानंतर जबरदस्ती लोकांना लाईट बंद करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही नागरिकांनी लाईट गेल्याचे कारण शोधले असता वीजपुरवठा जाणूनबुजून खंडीत करण्यात आल्याचं उघड झालं.

वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर वीज कर्मचारी रियाजुद्दीनच्या विरोधात लेखी तक्रार देण्यात आली. लेखी तक्रार दिल्यानंतर चौकशी केली असता रियाजुद्दीनने जाणूनबुजून वीजपुरवठा खंडीत केल्याचे उघड झाले असून त्याला तत्काळ बडतर्फ करण्यात आले आहे.