वारकऱ्याला लागली चक्क 50 लाखांची लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भगवान जब देता है तो छप्पर फाडके देता है, हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. पण, हेच वाक्य एका विठ्ठल भक्ताच्या बाबतीत खरं ठरलं आहे. पंढरीची वारी पोहचती करण्यासाठी आलेल्या वारकरी भाविकाने विठुमाऊलीच्या दर्शनानंतर घराकडे जाता जाता काढलेल्या 100 रुपयांच्या लॉटरी तिकिटाला चक्क 50 लाखाचे बक्षीस लागलंय. 50 लाख जिंकलेला ‘तो’ भाग्यवान वारकरी भाविक कोण याची उत्सुकता आता लॉटरी विक्रीत्यासह पंढरपूरकरांना देखील लागली आहे.

warkari-lottery-2

6 जानेवारीला पुत्रदा एकादशी होती. महिन्याची ही वारी पोहोचती करण्यासाठी हजारो वारकरी भाविक पंढरीत दाखल होत असतात. यापैकीच एका अज्ञात श्री विठ्ठल भक्त वारकऱ्याने चौफाळा परिसरातील शोभा लॉटरी सेंटर मधून 100 रुपयांचे एक लॉटरी तिकीट विकत घेतले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नाताळ नवीन वर्ष सोडतीचे हे तिकीट असून या लॉटरी सोडतीचा निकाल 8 जानेवारी रोजी लागला आहे. NY 02 43632 या क्रमांकाला प्रथम क्रमांकाचे म्हणजेच 50 लाखाचे बक्षीस लागले आहे. 50 लाखाचे बक्षीस मिळविणारा तो भाग्यवान कोण याची उत्सुकता पंढरीत शिगेला पोहोचली आहे.

warkari-lottery-1

श्री विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या प्रदक्षिणा मार्गावरील चौफाळ्यात आमचे लॉटरी दुकान आहे. कोणी अज्ञात वारकरी भाविकाने पुत्रदा एकादशीच्या दरम्यान हे तिकीट विकत घेतले आहे. त्या भाविकाला 50 लाखांचे बक्षीस लागले असून तो लखपती भाविक कोण याचा शोध आम्ही घेत आहोत.
– सुरेश खोबरे, लॉटरी विक्रीता