किर्गिस्तानमधील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना सतर्कतेचा इशारा; संपर्कात राहण्याचे हिंदुस्थानी दूतावासाचे आवाहन

किर्गिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या हिंदुस्थानी, पाकिस्तानी, बांगलादेशी विद्यार्थ्यांवर काही भागात झालेल्या हल्ल्यांनंतर हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये, अशी सूचना हिंदुस्थानी दूतावासाकडून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी दूतावासाच्या संपर्कात राहावे, असे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. येथे 15 हजार हिंदुस्थानी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

काय घडले 13 मे रोजी
13 मे रोजी किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमधील एका वसतिगृहात विदेशी आणि स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये मारहाणीची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी काही स्थानिक विद्यार्थ्यांना अटकही केली, मात्र खऱया गुन्हेगारांवर कारवाई होत नसल्याचे म्हणत इतर विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या खोलीत जाऊन तोडफोड केली होती. तसेच काही विद्यार्थिनींशी गैरवर्तनही केले. तीन पाकिस्तानी विद्यार्थी मारले गेल्याचेही वृत्त आहे. यामुळेच हिंदुस्थानी दूतावासाने आपल्या विद्यार्थ्यांना संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत, तर येथील परिस्थिती नियंत्रणात असून बिश्केकमध्ये पोलिसांनाचा अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आले आहे.