बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणणार, फक्त तीन महिन्यांचा वेळ द्या- पोलीस आयुक्त

बेशिस्त प्रवाशी वाहतूकदारांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात रिक्षाचालकांची घृणता दुर्देवी असून त्यांच्याकडून होणारी अरेरावी आणि अडवणूक त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे मस्तवाल आणि गुन्हेगारी प्रवृत्तींच्या रिक्षा चालकांना वठणीवर आणण्यासाठी आरटीओ, महानगरपालिका, पोलीस प्रशासनाकडून काम केले जात आहे. त्यासाठी मला फक्त तीन महिन्यांचा वेळ द्या, सर्व काही सुरळित होईल असा सूचक इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालाप कार्याक्रमात ते बोलत होते. त्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ.सुजित तांबडे उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले, अल्वयीन मुलीच्या अत्याचाराप्रकरणी ठोस कारवाईची अमंलबजावणी करण्यासाठी महापालिका, प्रादेशिक परिवहन कार्यालय, रेल्वे प्रशासनासोबत संपर्क साधला आहे. त्यासाठी आम्ही संयुक्तरित्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यास प्राधान्य दिले आहे. सध्या तातडीच्या उपाययोजना म्हणून रिक्षा चालकांची तपासणी, गस्त वाढवण्यासह फिक्स पॉईंटवर भर देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यावरही मी तीन महिन्याचा कालावधी मागितला होता. त्यानंतर तब्बल 54 संघटीत गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का लावून 360 हून अधिक गुंडांची रवानगी कारागृहात करण्यात आली. त्यामुळे आताही कारवाई अशी असेल की रिक्षाचालकांसह प्रवाशी वाहतूकदारांमध्ये दहशत नक्कीच बसेल बसणार आहे.

रिक्षा व्यवसायात काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक असल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला असून गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी ठोस पावले उचलणार आहे. याचा प्रत्यय लवकरच दिसणार आहे. विशेषतः महिला सुरक्षिततेसंदर्भात रेल्वे, एस टी, आरटीओ, ट्रॉफिक पोलीस, महापालिका, पीएमपी अशा सर्व प्रमुख घटकांशा समन्वयाने दीर्घकालीन उपाय योजना आखण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कामकाज सुरू असून लवरकच परिणाम दिसून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी होणारे महिलांवरील दुदैवी घटना रोखण्यासाठी सर्व घटकांशी समन्वय साधण्यात येत आहे. शहरात अनेक ठिकाणी निर्जन स्थळे असून महिलांना सुरक्षित वाटेल आणि गुन्हेगारांना संधी मिळू नये, यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यापासून अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ शिंदे यांनी केली.

दंडाची रक्कम तब्बल 90 कोटींवर

कोरोनाच्या काळात मुंबईपेक्षा पुणे पोलिसांनी तब्बल 90 कोटी रुपयांचा दंड आकारणी झाली आहे. त्यामुळे शहरात नागरिक मास्कचा वापर अधिक करु लागले आहे. कोरोना आजारावर नियंत्रण आणण्यात यश मिळाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या