
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क
हिंदुस्थानी डिजिटल पेमेंट वॉलेट असलेल्या पेटीएममध्ये उद्योगपती वॉरेन बफेट हे 2 हजार 448 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. सध्या या गुंतवणुकीबाबत वॉरेन बफेट यांच्या बर्थशायर हॅथवे आणि पेटीएममध्ये चर्चा सुरू असून पुढील काही आठवडय़ांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
पेटीएममध्ये आधीच चीनच्या अलीबाबा आणि जपानच्या सॉफ्टबँकच्या वन-97 कम्युनिकेशन या कंपनीची जवळजवळ 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे. बर्थशायर हॅथवे वन-97 कम्युनिकेशनमधील सुमारे 3 ते 4 टक्के समभाग खरेदी करेल, असे म्हटले जात आहे. पेटीएममध्ये गुंतवणूक झाली तर बर्थशायर हॅथवे हिंदुस्थानी कंपनीत गुंतवणूक करणारी पहिली कंपनी ठरणार आहे. दरम्यान, बर्थशायर हॅथवे आणि पेटीएमने अधिकृतरित्या त्याबाबत बोलणे टाळले आहे.
पेटीएमला काय फायदा होईल
बर्थशायर हॅथवे पेटीएममध्ये गुंतवणूक केली तर ‘फोन पे’ आणि गुगलच्या ‘तेज’ या वॉलेटशी टक्कर द्यायला अधिक बळ मिळणार आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीचे व्यवस्थापन आणि ई व्यापारात पुढे जाणेही शक्य होणार आहे.
summary- warren buffett to invest in paytm




























































