
नाशिकमधील वादग्रस्त अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात याला पाठीशी घालत आहेत का? असा खळबळजनक सवाल ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चाकणकर यांची पदावरून हटवण्याची मागणी देखील केली आहे.
तक्रारदारांवरच कारवाईचा प्रयत्न?
विजय कुंभार यांनी पत्रात असा दावा केला आहे की, अशोक खरात याच्या गैरकृत्यांबाबत सुमारे वर्षभरापूर्वीच तक्रार करण्यात आली होती. मात्र, महिला आयोगाने खरातवर कारवाई करण्याऐवजी या संदर्भात बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या माध्यमांवरच उलट कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. खरातने ४ एप्रिल २०२५ रोजी एका वर्तमानपत्राला दिलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये चक्क महिला आयोगाच्या पत्राचा संदर्भ दिला होता. महिला आयोगासारखी संवेदनशील संस्था पीडित महिलांच्या बाजूने उभी राहण्याऐवजी आरोपीला मदत करत असल्याचे यातून दिसून येते, असा आरोप कुंभार यांनी केला आहे.
अशोक खरात हा रुपाली चाकणकर यांच्याशी असलेल्या ओळखीचा आणि राजकीय प्रभावाचा वापर करून तक्रारी दडपण्याचे काम करत होता, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेले व्हिडीओ खरातची विकृती दर्शवणारे असून, त्याने चित्रीकरण करताना पार्श्वभूमीवर आरती किंवा स्तोत्रे लावून धार्मिकतेचा आव आणला आहे. हे सर्व व्हिडीओ ब्लॅकमेलिंगसाठी वापरले गेल्याची दाट शक्यता कुंभार यांनी व्यक्त केली आहे.


























































