… म्हणून धोनी जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक, पाहा मॅक्सवेलला कसं रनआऊट केलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रांची

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात रांचीमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात धोनीचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच आणि ख्वाजाने केलेल्या 193 धावांच्या भागिदारीनंतर मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल तुफानी खेळी करत होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 350 धावांचा टप्पा सहज गाठेल असे वाटत होते. परंतु धोनीच्या तपळाईमुळे मॅक्सवेल बाद झाला आणि हिंदुस्थानने कमबॅक केले व ऑस्ट्रेलियाचा संघ 313 धावांपर्यंत मजल मारू शकला.

ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान 42 वे षटक कुलदीप यादवने टाकले. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शॉन मार्शने कव्हर्सकडे जोराचा फटका मारला आणि धाव घेण्यासाठी पळाला. परंतु चपळ क्षेत्ररक्षक रविंद्र जाडेजाने सूर मारत चेंडू पकडला आणि वेगाने धोनीकडे फेकला. धोनीने देखील वेळेचे भान राखत ग्लोजने चेंडूला फक्त यष्ट्यांकडे दिशा दिली आणि बेल्स उडाले. मॅक्सवेल, समालोचक, क्षेत्ररक्षक आणि पंचांना देखील नक्की काय झालं हे कळाले नाही. अखेर तिसऱ्या पंचांनी मॅक्सवेलला धावबाद घोषित केला आणि रांचीमध्ये धोनी नामाचा जयघोष सुरू झाला.

म्हणून मॅक्सवेलची विकेट महत्त्वाची
चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मॅक्सवेलने आपल्या नेहमीच्या शैलीत खेळण्यास सुरुवात केली होती. बाद होईपर्यंत मॅक्सवेलने 31 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावा चोपल्या होत्या. आणखी काही वेळ जर तो मैदानात टिकला असता तर ऑस्ट्रेलियाने आणखी मोठी धावसंख्या रचली असती.