नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ; गंगापूर धरणाने तळ गाठला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा संपत आला आहे. त्यामुळे नाशिककरांना येत्या काही दिकसांत पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. आज महापौर रंजना भानसी यांनी  महापालिका पदाधिकाऱ्यांसमवेत गंगापूर धरणाला भेट देऊन जॅकवेलपर्यंत चर खोदण्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या पाहणीनंतर शहरातील पाणी नियोजनाबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 869 दशलक्ष घनफूट म्हणजेच 15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरण समुहातील काश्यपी धरणात 91 (5 टक्के), तर गौतमी-गोदावरीमध्ये 60 दशलक्ष घनफूट (3 टक्के) इतका पाणीसाठा आहे. या दोन धरणातून सोडलेले पाणी गंगापूर धरणातील एका खडकाच्या अडथळ्यामुळे जॅकवेलपर्यंत येवू शकत नाही. त्यामुळे धरणात चर खोदण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी सकाळी साडेदहा वाजता गंगापूर धरणाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी उपमहापौर प्रथमेश गीते, सभागृह नेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते संभाजी मोरुस्कर, दीक्षा लोंढे, अतिरिक्त आयुक्त (शहर) संदीप नलावडे, अधिक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, अविनाश धनाईत, उपअभियंता रवी पाटील आदी उपस्थित होते.

पाणी नियोजनाचा अहवाल सादर करा

उपलब्ध पाणीसाठय़ाचे 31 जुलैपर्यंत आरक्षण आहे. शहराला दर दिवसाला 450 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मात्र, पावसाने ओढ दिल्याने हे पाणी कधीपर्यंत पुरू शकते, पाण्याअभावी नाशिककरांचे हाल होवू नये म्हणून नियोजन आवश्यक आहे. धरणात किती पाणी उपलब्ध आहे, किती दिवस पुरेल या नियोजनाचा अहवाल पाणीपुरवठा विभागाने सादर करावा.