टिटवाळय़ातील पोस्ट ऑफिसमध्ये पाणी घुसले

सामना प्रतिनिधी । टिटवाळा

टिटवाळा येथील पोस्ट कार्यालयात पावसाचे पाणी शिरून दुरवस्था झाली आहे. महत्त्वाचे दस्ताऐवज पाण्यामुळे खराब झाले आहेत. जनरेटर, इंटरनेट यंत्रणा बिघडल्यामुळे ग्राहकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मांडा टिटवाळय़ातील हे पोस्ट कार्यालय १९७६ साली सुरू झाले. मात्र आजतागायत दुरुस्ती केली नसल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे. ग्राहकांना धड उभे राहायलाही जागा नाही. इथले कर्मचारी तर जीव मुठीत घेऊन काम करतात. आता तर पावसाचे पाणी पोस्ट कार्यालयात शिरून मोठे नुकसान झाले आहे. मोठी दुर्घटना घडण्याआधी पोस्ट कार्यालय स्थलांतर करावे अशी मागणी एकदिलासा सामाजिक संस्थेच्या सचिव दर्शना शेलार यांनी केली आहे.