बारवी धरणातील पाणीसाठा 42 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
barvi-dam-badlapur

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

उन्हाचा तडाखा वाढल्याने तहानेने जीव कासावीस होत असतानाच ठाणे जिह्यावर पाणीटंचाईचे ढग घोंघावत आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या शहरांना पाणीपुरवठा करणाऱया बारवी धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत असून पाण्याची पातळी अवघ्या 42 टक्क्यांवर येऊन पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठय़ात तब्बल 10 टक्के तूट पडली असून पुढील दोन महिन्यांत धरणातील पाणी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे. हा पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल, असा दावा पाटबंधारे विभाग करत आहे. मात्र जलसाठा याच वेगाने कमी होऊ लागला तर आधीच पाणीकपातीचे चटके सहन करणाऱया ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.

बारवी धरणात सध्या 59.093 मीटर इतका म्हणजे 99.9 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.

टक्केवारीनुसार हा साठा 42.51 इतका आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत धरणाचा साठा 61. 50 मीटर म्हणजे 51.10 टक्के होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 10 टक्के कमी झाला आहे. त्यामुळे जिह्यावर पाणीबाणीचे संकट आहे.

यंदा पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी लवकर अनपेक्षित एक्झीट घेतली. त्यामुळे डिसेंबरपासूनच बारवी धरणातून पाणीपुरवठा होणाऱया शहरांमध्ये 30 टक्के कपात करण्यात आली. पाणीपुरकठा करणारे एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना शटडाऊनचे वेळापत्रक ठरवून देण्यात आले. मात्र निवडणूक वर्ष असल्यामुळे आणि पाण्याची मागणी वाढल्यामुळे भरमसाट पाणीउपसा सुरू राहिला. शटडाऊनचे वेळापत्रक पाळूनही बारवी धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली, तर दुसरीकडे मार्च महिन्यापासूनच तापमान कमालीचे काढले असल्यामुळे बाष्पीभवन होऊन झपाटय़ाने पाणी आटत आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास मे अखेरपर्यंत मोठे पाणीसंकट उद्भवण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

लवकरच फेरबैठक

पाटबंधारे विभागाने पाणीकपातीचे नियोजन केल्यामुळे 15 जुलैपर्यंत नो टेन्शन असे तूर्तास सांगण्यात येत आहे, पण गरज पडल्यास पाणीकपात आणखी वाढण्याचा इशाराही देण्यात येत आहे. यासंदर्भात फेरआढावा बैठक घेण्यात येणार असून त्यानंतरच पाणीकपातीचा निर्णय होणार आहे.