देवगडातील दहिबाव जलस्त्रोतातील पाणीपातळी घटली; पाणीटंचाईची स्थिती गंभीर

दहिबाव नळयोजनेवर पुन्हा एकदा संकट आले आहे. या योजनेच्या जलस्त्रोतातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने देवगड जामसंडेवासियांचा पाणीप्रश्न पुन्हा गंभीर होण्याचा मार्गावर आहे. आठवड्याभरापूर्वी पंपिंग यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दहिबाव कुपलवाडी येथे जलवाहिनी फुटल्याने देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा सात दिवस बंद होता. मात्र, आता पाणीपातळी घटल्याने पुन्हा एकदा पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.

जलवाहिनी व पंपिंग यंत्रणा दुरूस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, सद्यस्थितीत जलस्त्रोतातील पाण्याची पातळी घटत आहे. गेल्यावर्षी नगर पंचायतीने नदीपात्रातील गाळ काढल्याने पाणीपातळी वाढली होती. मात्र यावर्षी उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. हा देवगड जामसंडेवासियांसाठी चिंतेचा विषय आहे. पाणीटंचाईमुळे सध्या नागरिकांना पैसे माजून पाणी विकत घ्यावे लागत आहे.

नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी पाणीपातळी कमालीची घटत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. मात्र, तरीही शिरगाव पाडाघर योजनेवरून जास्तीत जास्त पाणी उचलून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा असे नियोजन करण्यात येत आहे. सध्या पाणी टंचाईचा कालावधी असल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पावसाळा सुरू होईपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.