येरोळ परिसरातील पाणी पातळी घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । येरोळ

येरोळ परिसरात यंदाच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेली आहे. शिवारात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने पाणी मिळवण्यासाठी तब्बल सातशे ते आठशे फुटापर्यंत बोअर घेऊन शेतकऱ्यांकडून मोठा खर्च करून जमिनीतून पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

यंदा या भागात अल्प पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आाहे. येरोळसह बोळेगाव, डिगोळ, सुमठाणा, दैठणा, कारेवाडी, चामरगा या भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीची उत्पादन वाढविण्यासाठी परिस्थितीनूसार बोअर, विहिरी घेऊन जमिनीकडून पाणी मिळवून घेऊन दोन, चार, सहा एकरापर्यंत शेती ओलीताखाली आणली. यात अनेक वर्षे शेतातील विहिरी, बोअरच्या पाण्याने साथ दिली. याच पाणी स्त्रोताच्या भरवंशावर शेतात आलं, हळद, पपई, चिकू, आंबा, ऊस आदी बागायती पिकांची लागवड केली. मात्र यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक वर्षे शेतातील पाणी स्त्रोत अटले. त्यामुळे शेतातील लाखो रुपये खर्च करून उभा केलेल्या बागा वाळून जात असल्याने अनेक शेतकरी ठिबक सिंचनाच्या मदतीने कमी पाण्यावर बागा जगवित आहेत. आर्थिक परिस्थिती नसतानाही व्याजी पैसे काढून शेत शिवारात बोअर घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

तीनशे फुटापर्यंत ६८ रुपये प्रति फुट दर घेतले जात असून तीनशे ते चारशे दहा रुपयात वाढ करून ७८ रुपये तर चारशे ते पाचशे फुटापर्यंत ८८ रुपये तर पाचशे फुटाच्या पुढे दुप्पट म्हणजे शुल्क वाढ करून बोअरसाठी महागडे दर आकारून बोअर मशीनवाले शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करीत आहेत. जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेल्याने सातशे ते आठशे फुटापर्यंत शेतकऱ्यांकडून बोअर घेतले जात असून केसीगसाठी प्रति फुट अडीचशे रुपये तर शेतकऱ्यांना सातशे फुट बोअर घेतले तर तब्बल ६५ हजार रुपये मोठा खर्च करून बोअर घेतले जात आहेत. यात कांही शेतकऱ्यांना थोडेफार पाणी लागत असून अनेक शेतकऱ्यांना सातशे फूटापर्यंत बोअर कोरडेच जात आहेत. मोठा खर्च करूनही पाणी लागत नसल्याने शेतकरी नाराज होत आहे. सातशे फुटापासून जमिनीतील बोअरचे पाणी मिळविण्यासाठी महागडी मोटार, पाईप, वायर याचाही शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे.

यंदाच्या दुष्काळी पाणी टंचाईमुळे बागायतदार शेतकऱ्यांना पुढे आड मागे विहीर अशी अवस्था शेतकऱ्यांची झाल्याने शेतकरी पूर्णतः आर्थिक संकटात सापडले असल्याचे शेतकरी रावसाहेब पाटील, बाबूराव साकोळकर, गुडेराव चौसष्ठे, महालिंग सिंदाळकर, भीमराव सूमठाणे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले. बागायतदार शेतकऱ्यांना अडीच, तीन लाखापर्यंत बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.