पेणमध्ये दादर गावात भरतीचे पाणी घुसले, लाखोंचे नुकसान 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

पेण तालुक्यातील दादर गावामध्ये शुक्रवारी दुपारी खाडीला आलेल्या भरतीचे पाणी घुसून गावातील नागरिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन त्यांनी नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे सुरू केले.

पेण तालुका हे भाताचे कोठार समजल्या जाणार्‍या दादर गावात पाणी शिरल्याने येथील घरातील धान्यासह घरातील सामानाचे देखील मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे दादर गाव हे खाडीलगत असल्याने मासेमारी आणि रेती व्यवसाय देखील येथील नागरिक करीत असल्याने या भरतीच्या पाण्यामुळे अनेकांच्या छोट्या मोठ्या होड्या आणि रेतीचे नुकसान देखील झाले आहे.

1989 साली आलेल्या महापुरामध्ये असेच या गावामध्ये पाणी शिरले होते. मात्र त्यानंतर तीस वर्षानंतर या गावात भरतीचे अचानक पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार हरिश्चंद्र कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनाम्यांना सुरुवात केली असून या ठिकाणच्या घरांचे तसेच रेती व्यावसायिक आणि शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.