संगमेश्वर तालुक्यातील ८ पाणी नमुने दूषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवरुख

संगमेश्वर तालुक्यातील जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या ३०८ पाणी नमुन्यांपैकी ८ पाणी नमुने दूषित असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या पाणी नमुने तपासणीचा अहवाल नुकताच जिल्हा प्रयोगशाळेकडून संगमेश्वर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. यामध्ये माखजन, धामापूर, वांद्री या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हे पाणी दूषित आढळले आहेत.

आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून दर महिन्याला सार्वजनिक ठिकणामधील पाण्याच्या स्त्रोतांचे नमूने घेऊन ते तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. यामध्ये दूषित आढळणाऱ्या पाणी स्त्रोतांमध्ये मेडिक्लोर, टीसीएल पावडर आदी औषधांचा वापर करुन हे अशुद्ध पाणी शुध्द केले जाते. यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायतची यंत्रणा कार्यरत असते. जुलै महिन्यात तालुक्यातील बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्रातील १८, देवळे ३१, धामापूर ४३, कडवई २१, माखजन ४०, कोंडउमरे १४, निवेखुर्द ४०, फुणगूस २४, साखरपा ३२, सायले २६, वांद्री १९, असे एकूण ११ प्रा आ केंद्रातील ३०८ पाणी नमूने तपासण्यासाठी घेण्यात आले होते. यामध्ये धामापूर् प्रा. आ. केंद्रातील ४, माखजन २, वांद्री २ असे एकूण ८ पाणी नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.