
भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पालिका लवकरच भूमिगत सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार आहे. ‘मेब्रेन बायोरिएक्टर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानातून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून दररोज 500 किलोलिटर पाणी उपलब्ध होणार असून हे पाणी उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या स्वच्छतेसाठी वापरले जाणार आहे. आगामी काळात उद्यानात होणारे प्रकल्प, येणारे नवीन प्राणी यांच्यामुळे पाण्याची गरज वाढणार असल्यामुळे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
भायखळा येथे 25 एकर जमिनीवर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान विकसित करण्यात आले आहे. 2015 पासून सुरू झालेल्या प्राणिसंग्रहालयाच्या सुधारणांच्या कामात आगामी काळात या ठिकाणी अनेक सुधारणा करण्यात येत आहेत. यामध्ये बृहत् आराखडय़ानुसार प्राणिसंग्रहालयाजवळ असलेल्या सात एकरांच्या जमिनीवर विदेशी प्राण्यांसाठी विभाग उभारण्यात येणार आहे. तसेच प्राणिसंग्रहालयात देशाच्या विविध भागांत आढळणारे दुर्मिळ प्राणीही लवकरच आणले जाणार आहेत. या प्राण्यांसाठी सध्या पिंजरे उभारण्याचे
काम प्रगतिपथावर आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढणार असल्यामुळे भूमिगत मलजल प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी करता येणार आहे. पालिका याकरिता 10 कोटी 59 लाख रुपये खर्च करणार आहे.

























































