लोअर दुधना प्रकल्पातून कालव्याद्वारे सोमवारी पाणी सोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सेलू  

तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पातून लवकरच डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोमवारी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. प्रकल्पातील पाणी कालव्याद्वारे दोन वेळा सोडण्याचे आश्वासन नुकतेच जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिले होते. असे असताना देखील तालुका व परिसरात भीषण दुष्काळ असताना देखील प्रकल्पातील पाणी केवळ एकवेळा संरक्षित पाणीपाळी या नावाने सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

येथील दबावगटाच्या वतीने अ‍ॅड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ आदींसह शेतकर्‍यांनी मागील एक महिन्यापासून प्रकल्पातील पाणी कालव्याद्वारे दोनवेळा सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती.

विविध आंदोलने व रस्तारोको आंदोलन देखील करण्यात आले. कारण सेलू व परिसरात भीषण दुष्काळ असल्या कारणाने रब्बीची पूर्ण पेरणी झालेली नाही. काही प्रमाणात पेरणी झालेल्या पिकांना देखील पाण्याची आवश्यकता आहे. म्हणून दोनवेळा पाणी सोडण्यात आले असते तर शेतकर्‍यांची उभी पिके वाचवता आली असती. त्या शिवाय शेतकर्‍यांना रब्बीची पेरणी देखील करता आली असती. तसेच काही प्रमाणात चार्‍याचा प्रश्न देखील सोडवता आला असता. म्हणून दबाव गटाच्या वतीने निमंत्रक अ‍ॅड. श्रीकांत वाईकर यांनी प्रकल्प क्षेत्रातील लाभार्थी शेतकर्‍यांचे नेतृत्व करत पाणी सोडण्यासाठी पुढाकार घेतला होता.

जलसंपदा विभागाकडे मागणी लावून धरली होती. एवढेच नव्हे तर रास्तारोको आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यानंतर प्रत्यक्ष मुंबईला जावून भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन परिसरातील परिस्थिती व पाणी सोडण्याची गरज लक्षात आणून दिली होती. त्यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी प्रकल्पातील पाणी दोनवेळा कालव्याद्वारे सोडण्याचे आश्वासन देखील दिले होते. मात्र जेव्हा प्रत्यक्ष पाणी सोडण्याची वेळ आली तेव्हा संरक्षीत एकच पाणीपाळी सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रकल्पातील कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यातून शेतकर्‍यांनी केवळ उभ्या पिकांनाच पाणी देऊन त्यांचे संरक्षण करायचे, हाच संरक्षीत पाणीपाळीचा मुख्य हेतु आहे. त्यामुळे आगामी रविवार, २५ नोव्हेंबरपर्यंत जलसंपदा विभागाकडून लोअर दुधना प्रकल्पातील पाणी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात येईल. त्यामुळे लाभार्थी शेतकर्‍यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल व लाभ क्षेत्रातील जणावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही दिवसांसाठी मार्गी लागेल. म्हणून सर्वसामान्य शेतकरी देखील या निर्णयाचे स्वागतच करतील. असेच म्हणावे लागेल.

पाणी जपून वापरा-मंगल पांडे

लोअर दुधना धरणातून पाणी सोडण्याचे निश्चित झाले आहे ही माहिती खरी आहे. २६ ला सोमवारी पाणी सोडण्यात येणार आहे. परंतु हे पाणी केवळ जनावरांचा चारा तसेच शेतकर्‍यांच्या पेरणीसाठी जास्त उपयोगात आणायला हवे. शेतकरी व जनतेने पाण्याचे योग्य नियोजन आधीच करून ठेवावे. कारण धरणात पाणी मुळातच कमी आहे. परंतु शेतकर्‍यांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी जपून वापरावे असे आवाहन जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता मंगल पांडे यांनी केले आहे.

शासनाच्या निर्णयाचे स्वागत- अ‍ॅड.श्रीकांत वाईकर

शेतकरी आज दुष्काळामुळे हैराण आहे. शेतकर्‍यांच्या पेरण्या देखील पाणी नसल्याने रखडल्या आहेत. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. यामुळे आम्हाला शेतकर्‍यांसाठी आंदोलन करावे लागले. पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार असून या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया दबाव गटाचे अ‍ॅड. श्रीकांत वाईकर यांनी दिली.