निराच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले, पिकांना जीवदान मिळणार; विहिरी, बोअरवेलला वाढणार पाणी

पुरेसा पाऊस नसल्याने पंढरपूर तालुक्यातील विहिरी, ओढे, नाले अद्यापि कोरडेठाक पडलेले आहेत. जुलैच्या अखेरीस पडलेल्या जेमतेम पावसावर खरिपाची पेरणी केलेल्या मका, बाजरी, तूर, ऊस, फळबागा पिकांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यातच नीरा उजवा कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या पाण्यामुळे विहिरी, बोअरवेलला पाणी वाढणार असल्याने ही पिके पार पडण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जूनच्या सुरुवातीपासून पावसाने पंढरपूर तालुक्याला हुलकाणी दाखवली आहे. तर जून बरोबर जुलैही जेमतेमच गेला. मोठा पाऊस पडला नाही. जुलैच्या अखेरीस मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने मोठ्या धाडसाने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या केल्या आहेत. शेतकऱयांनी बहुतांश मका, बाजरी, तूर या पिकांची पेरणी केली आहे. आता ही पिके जोमाने वाढत आहेत. तर हातातून जाऊ लागलेल्या उसालाही पावसामुळे दिलासा मिळाला आहे. तर बोर, डाळिंब, पेरू, सीताफळ, लिंबू, पपई आदी पिकांनाही जीवदान मिळाले आहे. मात्र, जुलै संपला व ऑगस्ट सुरू झाला. मात्र, केवळ आकाशात ढगाळ वातावरण तयार होत आहे. मोठा पाऊस पडत नाही, त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे.

गतवर्षी ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाल्याने ओढे, नाले भरून वाहत होते. तर विहिरी, बोअरवेलही ओव्हरफ्लो झाले होते. आता नको पाऊस, पुरेसा झाला, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. डाळिंब, बोर, केळी पिकांचे पावसामुळे नुकसान झाले होते. शासनाकडून पंचनामे करण्यात येत होते. सध्या मात्र शेतकरी दमदार पावसाच्याच प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी ओढे, नाले, विहिरी कोरड्याठक पडलेल्या आहेत.

पंढरपूर, सांगोला तालुक्यांतील पाण्याची निर्माण झालेली पाण्याची टंचाई पाहाता शेतकऱयांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन नीरा उजवा कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेती पिकांना जीवनदान मिळणार आहे. त्याचबरोबर विहिरी, ओढे, नाले, बोअरवेल यांच्या पाणीपातळीतदेखील वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या हंगामातील पिके निघतील, अशी आशा आता शेतकऱयांना आहे.

सोनके तलावात पाणी सोडण्याची मागणी

नीरा उजवा कालव्याच्या पाण्यातून सोनकेतिसंगी येथील तलाव भरून घेण्यात येतो. त्यामुळे शेतीचे आवर्तन पूर्ण झाले की तलाव भरून घ्यावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे. या तलावातून सोनके, वाखरी, गादेगाव, भंडीशेगाव, शेळवे आदी 9 गावांतील शेतीला पाटाने पाणी पुरवण्यात येते.