खारघर, तळोजात पाण्याचा ठणठणाट

520

खारघर, तळोजा हे विभाग पनवेल महापालिका हद्दीत येत असले तरी नागरी सुविधा पुरवण्याचे काम अद्यापि सिडकोकडे आहे. या अजबगजब कात्रीत येथील रहिवासी अडकले असून विविध नागरी प्रश्नांचा सामना त्यांना करावा लागत आहे. ही कटकट कमी की काय म्हणून नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याविरोधात शिवसेनेने आवाज उठवत सिडकोवर धडक देत याचा जाब विचारला. 

खारघर व तळोजा हे विभाग अत्यंत प्रशस्त आहेत. मात्र प्रशसनाच्या भोंगळ कारभारामुळे या भागात अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. पाणीटंचाई तर पाचवीलाच पुजली असून नाले, ड्रेनेजच्या तकलादू कामामुळे रस्त्यांवर सांडपाणी येऊन नागरिकांना नाक मुठीत धरून चालावे लागते. नोड्स विकसित करताना मूळ गावठाणे दुर्लक्षित केली आहेत. साधी गटारे व नळ पाणीपुरवठा योजना कार्यरत नाहीत. संतापजनक म्हणजे गार्डन, पार्किंग, मेंटेनन्स, हाऊसकिपिंग तसेच अन्य कामे प्रकल्पग्रस्तांना देणे बंधनकारक असताना ती मर्जीतील ठेकेदारांच्या घशात घातली जातात. हे प्रश्न आ वासून उभे असतानाच या भागात पाणीप्रश्न पेटला आहे. याबाबत शिवसेनेचे तालुका संघटक  भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, शाखाप्रमुख संतोष पाटील, रमेश पाटील, दीपेश साळकर यांच्यासह शिवसैनिकांनी सिडकोवर धडक देत अधिकाऱयांना जाब विचारला. मुख्य अभियंता संजय चौटालिया यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

 

आपली प्रतिक्रिया द्या