परळी तालुक्यातील संगम, पुस प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना भेटणार पुनरुज्जीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, परळी वैजनाथ
अनेक दिवसांपासून काही तांत्रिक कारणांमुळे परळी तालुक्यातील संगम १८ खेडी व पुस २० प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद होती. या योजनांचे पुनरूज्जीवन मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून करण्याच्या सूचना बबनराव लोणीकर यांनी सोमवारी दिली. पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना दिली असून बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची कामे जलद गतीने करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. बीड व जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पाणी पुरवठा व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, मुख्य अभियंता सी. आर. गजभिये, आर. एस. लोलापोड, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, बीडचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, कार्यकारी अभियंता खंडारे आदी यावेळी उपस्थित होते.

वीज बीलाची थकबाकी व इतर काही तांत्रिक कारणांमुळे संगम अठरा खेडी व पुस वीस खेडी योजना सध्या बंद आहेत, त्यामुळे या योजनांवर अवलंबून असणार्‍या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या दोन्ही योजनांचे पुनरुज्जीवन मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून सौर उर्जेद्वारे करणे तसेच त्यासाठी बीड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी एकत्रितपणे सदर योजनांना तातडीने भेट देवून अहवाल सादर करण्याचे आदेश लोणीकर यांनी दिले आहेत.