
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उजनी धरणातून डाव्या कालव्यातून उद्यापासून वारंबा, मोहोळ, कुरुल, अंकोली येथे पाणी सोडले जाणार आहे. उन्हाळ्यातील हे शेवटचे आवर्तन असणार आहे. त्यानंतर धरणातील जिवंत पाणीसाठा संपणार असून, उर्वरित मृत पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच वापरला जाणार आहे. शासनस्तराकरून जलसंपदा विभागाला तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सोलापूर, नगर, पुणे जिह्यांसाठी उजनी धरण वरदान ठरले असून, धाराशिव शहरासाठीदेखील उजनीतूनच पाणी दिले जाते. अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला; पण सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे सध्या सोलापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागते. त्यात मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो. शेतीला पाणी सोडले जाते; पण कालवे नादुरुस्त असल्याने खूप पाणी वाया जाते, अशी सद्यःस्थिती आहे.
उजनी धरणात सध्या एकूण पाणीसाठा 76 टीएमसी असून, त्यात जिवंत पाणीसाठा 12 टीएमसीपर्यंतच आहे. दरम्यान, आता शेतीसाठी रविवारपासून आणखी एक आवर्तन सोडले जाणार असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात धरणातील जिवंत पाणीसाठा संपणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार फेब्रुवारीपासून कॅनॉल, बोगदा यांसह सीना-माढा व दहीगाव उपसा सिंचन योजनेतून सुरूच आहे. 10 मेपर्यंत हे आवर्तन सुरू राहणार आहे. त्यानंतर मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत शेतीसाठी पाणी सोडले जाणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामागे यंदा मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
यंदाच्या मान्सूनकर ‘अल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. गारपीट, तापमानातील चढ-उतार यामुळे मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने मान्सून लांबेल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांचा आहे. या पार्श्वभूमीवर शासनस्तरावरून जलसंपदा विभागाच्या सर्वच अधिकाऱयांना धरणातील पाण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता शेतीचे आवर्तन संपल्यानंतर उजनी धरणातील पाणीसाठा पिण्यासाठीच राखीव ठेवला जाणार आहे.
























































