
केरळमधील वायनाड येथे आपल्या घराच्या अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. जिहास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला तरुण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 फेब्रुवारी रोजी ही मुलगी घराच्या अंगणात खेळत असताना आरोपीने तिला उचलले आणि स्कूटीवरून मंथनवाडीच्या पुलिक्काड परिसरातून पळ काढला. मुलीला साधारण 8 किलोमीटर दूर नेल्यानंतर, रात्री 9 च्या सुमारास स्थानिकांनी तिला एकटीला फिरताना पाहिले आणि तातडीने पोलिसांना कळवले. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ विशेष तपास पथक स्थापन केले. तपासादरम्यान परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, ज्यात आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसला. मात्र, फुटेज अस्पष्ट असल्याने त्याचा चेहरा नीट ओळखता येत नव्हता. अशा परिस्थितीत पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर लूकआउट नोटीस जारी करून कोझिकोड रेल्वे स्थानकावरून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी जिहास हा बंगळुरूमध्ये काम करतो आणि चोरीच्या उद्देशाने या भागात येत असे. त्याच्यावर यापूर्वी गांजा तस्करीशी संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. मुलीच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या उद्देशाने त्याने हे अपहरण केले होते. त्याने तिचे कानातले काढण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीने आरडाओरडा केल्याने घाबरलेल्या आरोपीने तिला रस्त्यावर सोडून पळ काढला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान एका वेगळ्या आणि गंभीर रॅकेटचाही पर्दाफाश झाला आहे.

























































