Bihar election result – “स्वत:च्या बळावर सरकार स्थापन करू किंवा…”, प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केली भूमिका

बिहारमध्ये आज विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. बिहारमध्ये एनडीए सत्तेत येणार की तेजस्वी यादव मुसंडी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना जनसुराज पार्टीचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी भाजपवर निशाणा साधला. निकालानंतर जनसुराज पार्टी सत्तेसाठी भाजपसोबत जाणार का, अशा चर्चा सुरू असताना कोणत्याही प्रकारची युती होणार नाही असे म्हणत प्रशांत किशोर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘एएनआय’ला दिलेल्या एका मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी युतीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. पक्षाच्या तत्वांशी तडजोड करण्यापेक्षा लोकांसोबत काम करत राहण्यास प्राधान्य देतील, असे ते यावेळी म्हणाले. बिहारच्या लोकांना जर अजूनही राजकीय बदल नको असेल, तरी आम्ही त्यांच्यासोबत राहून पुढील पाच वर्ष आणखी चांगले काम करत राहू. सरकारमध्ये सामील होण्याचा प्रश्नच येत नाही. एकतर जनसुराज स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करेल किंवा आम्ही विरोधी पक्षात बसू हे निश्चित. गरज पडल्यास, आम्ही दुसरी निवडणूक देखील घडवून आणू. आम्ही भाजपच्या विरोधात आहोत, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.

“जनसुराजच्या स्थापनेसाठी आणि पक्षाच्या उभारणीसाठी आम्ही आमचे रक्त आणि घाम गाळला आहे. बदल आधीच दिसत आहे, त्यामुळे मला वाटते आपण निकालांची वाट पाहूया. जेव्हा आकडे येतील तेव्हा सर्वात वाईट काय घडू शकते? कदाचित जनसुराजला यावेळी इतक्या जागा मिळणार नाहीत, तर आपण आणखी पाच वर्षे काम करू. घाई कसली आहे? मी 48 वर्षांचा आहे; मी यासाठी आणखी पाच वर्षे देऊ शकतो”, असे यावेळी प्रशांत किशोर म्हणाले.

भावासोबतचे संबंध संपले, मी शेवटच्या श्वासापर्यंत RJD मध्ये परतणार नाही; तेज प्रताप यादव यांचे मोठे विधान

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. कारखाने उभारताना बिहारकडे दुर्लक्ष करून गुजरातला अधिक प्राधान्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते बिहारमधून मते घेतात, म्हणून त्यांनी बिहारमध्येही कारखाने उभारावेत. गेल्या 15 वर्षांपासून पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये नाही तर गुजरातमध्ये कारखाने उभारले आहेत,” असे प्रशांत किशोर यांनी एका प्रचार सभेत म्हणाले.

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा होत्या. यापैकी एकूण सगळ्याच जागांवर जनसुराज पार्टीच्या उमेदवारंनी निवडणुक लढवली आहे. त्यामुळे आता जनसुराज पार्टी किती जागांवर मुसंडी मारेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दरम्यान जर जनसुराज पक्षाने 150 पेक्षा कमी जागा जिंकल्या तर तो माझा पराभव असेल. जर ते त्यापेक्षा जास्त जागा जिंकले तर तो बिहारच्या लोकांचा विजय असेल, असे मत प्रशांत किशोर यांनी यांनी स्पष्ट केले.

Bihar Election 2025- प्रशांत किशोर यांनी फुंकले रणशिंग; पक्षाला 150 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर तो माझा पराभव, मात्र…