
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्यावरून देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्युलर) मध्ये फूट पडली आहे. कर्नाटक जेडीएसचे अध्यक्ष सीएम इब्राहिम यांनी भाजपच्या वळचणीला उभे राहण्याला विरोध केला असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जेडीएसचा सहभाग नसेल, असे म्हटले आहे. मी कर्नाटकचा अध्यक्ष आहे. मी भाजपसोबत युती करणार नाही. ज्यांना जायचे ते जाऊ शकतात. आम्ही इंडिया आघाडीशी चर्चा करू, असे त्यांनी म्हटले आहे.
देवेगौडा यांचे चिरंजीव आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी 22 सप्टेंबरला दिल्लीत जे. पी. नड्डा, अमित शहा यांची भेट घेऊन भाजपसोबत युतीची घोषणा केली होती. त्याला इब्राहिम यांनी थेट आव्हान दिले आहे. आमचाच पक्ष खरा आहे. देवेगौडा यांना तमिळनाडू, महाराष्ट्र, केरळमधून समर्थन नाही. अशा वेळी ते राष्ट्रीय अध्यक्ष कसे असतील. त्यांनाही मी परत या असे सांगतो आहे, असे सांगत इब्राहिम यांनी खळबळ उडवून दिली.



























































