कर्जमाफीची मागणी लावून धरणार, सरकारकडून कामे करून घेणार; उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला धीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मराठवड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी लातूरच्या काटगावात दुष्काळी भागची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचा आवाज आपण सरकारपर्यंत पोहचवणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरणार असल्याचे सांगितले. या कठीण परिस्थितीत आण शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून कोणीही खचून जात टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांनी केले आहे.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरकारने केलेली मदत पुरेशी आहे का? असा सवाल शेतकऱ्यांना केल्यावर शेतकरी म्हणाले की, सर्व जमीनच वाहून गेली आहे. आता नवीन माती आणून टाकण्यापासून अनेक कामे आहेत. त्यामुळे सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, तसेच कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जमीनच वाहून गेल्याने पुढील हंगामही अडचणीत आला आहे. मुख्यमंत्री आले आणि निघून गेले, त्यांनी आमच्या समस्याच जाणून घेतल्या नाही, याबाबतही शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

जमीनच वाहून गेली आहे, तर शेतकरी किती अडचणीत आला आहे, याची सरकारने जाणीव ठेवावी, आता शेतकऱ्यांना जगवण्यासाठी मोठी मदत आणि कर्जमाफीची गरज असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग आहे, येथे अवर्षण हे नेहमीचे आहे. मात्र, पहिल्यांदाच येथे अतिवृष्टी झाली असून पूरपरिस्थितीचे मोठे संकट ओढवले आहे. आता त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. सरकारने जाहीर केलेली मदत 2023 च्या निकषांप्रमाणे आहे. त्यामुळे येथील नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना साथसोबत करण्यासाठी आपण आलो आहोत. या कठीण परिस्थितीत कोणीही खचून जाऊ नये, आणि टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

आम्ही तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांचा आवाज आपण सरकापर्यंत पोहचवणार असून शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आपण करून घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. सरकारने जाहीर केलेली मदत वेळेवर येते की नाही, याकडेही लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारसमोर लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्जमुक्तीची मागणीही सरकारकडे लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.