आमच्याकडून चूक झाली.. इंडिगोचे अध्यक्ष विक्रम सिंग मेहता यांनी व्यक्त केली दिलगिरी

गेल्या आठवड्याभरापासून इंडिगोची विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे, प्रवाशांना नाहक जाच सहन करावा लागला. विमान उड्डाणे लांबणीवर पडल्याने तसेच रद्द झाल्याने हजारो प्रवासी ताटकळले. याच पार्श्वभूमीवर आता कंपनीचे अध्यक्ष आणि स्वतंत्र पदभार असलेले विक्रम सिंग मेहता यांनी बुधवारी (१० डिसेंबर ) एक सविस्तर सार्वजनिक संदेश जारी केला. या संदेशांतर्गत एअरलाइनच्या चुकांची कबुली दिली आणि माफी मागितली. ८ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कंपनी आपल्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरली आणि ही परिस्थिती एअरलाइनसाठी एक गंभीर धडा आहे.

मेहता यांनी असेही म्हटले की, ३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या घटनेमुळे कंपनीचे संपूर्ण नेटवर्क विस्कळीत झाले. परंतु आता ऑपरेशन्स पूर्णपणे सामान्य झाले आहेत आणि एअरलाइन पुन्हा तिचे नियमित वेळापत्रक चालवत आहे.

सोशल मीडिया आणि काही वृत्तांत असा दावा केला आहे की, इंडिगोने नवीन पायलट विश्रांती वेळ (फ्लाइट ड्युटी वेळ मर्यादा) नियमांचे पालन करू नये म्हणून जाणूनबुजून उड्डाणे रद्द केली. मेहता यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, एअरलाइनने जुलै आणि नोव्हेंबर दोन्ही टप्प्यांमध्ये पायलटांसंदर्भातील सर्व नियमांचे यथायोग्य पालन केले आहे. त्यांनी कधीही त्यांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी सांगितले की, कंपनीवर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि बिनबुडाचे आरोप आहेत.

मेहता यांच्या मते, काही तांत्रिक बिघाड, नवीन हिवाळी वेळापत्रक लागू करणे, खराब हवामान आणि देशातील हवाई वाहतूक नेटवर्कमध्ये गर्दी यासह अनेक घटना एकाच वेळी घडल्या. शिवाय नवीन क्रू रोस्टरिंग नियमांमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली. त्यांनी कबूल केले की, कारण काहीही असो, यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आणि कंपनीच्या ट्रॅक रेकॉर्डवर हा एक कलंक आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आधीच संपूर्ण घटनेची चौकशी करत आहे. इंडिगोने व्यत्ययाची मूळ कारणे ओळखण्यासाठी आणि भविष्यात अशीच परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून बाह्य तांत्रिक तज्ञांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

अध्यक्षांच्या मते, इंडिगो आता नियमित कामकाजात परतली आहे आणि दररोज १,९०० हून अधिक उड्डाणे घेऊन १३८ ठिकाणी सामान्यपणे सेवा देत आहे. त्यांनी कबूल केले की प्रवाशांचा विश्वास परत मिळवणे सोपे होणार नाही. त्यांनी असा निष्कर्ष काढला की, “आम्ही चूक केली आहे. शब्दांनी नव्हे तर आमच्या कृतींनी विश्वास परत मिळवला जाईल.” दरम्यान, इंडिगोने एक्स (पूर्वी ट्विटर) वर एक अपडेट देखील जारी केला आहे. यात म्हटले आहे की, कंपनीचे ६५,००० कर्मचारी ऑपरेशन्स पूर्ववत करण्यासाठी मनापासून काम करत आहेत. अशा समस्या पुन्हा येऊ नयेत यासाठी एअरलाइनची संकट व्यवस्थापन टीम दररोज उच्च व्यवस्थापन आणि ग्राउंड टीमशी बैठक घेत आहे.