साहित्य जगत: आम्हांस आम्ही पुन्हा पहावे

>> रविप्रकाश कुलकर्णी

मराठी सांस्कृतिक जगताचे पुरेपूर जाणते भान असणारे जयवंत दळवी नेहमी म्हणत की, एरवी सगळीकडे तीन काळ असतात… भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ, पण मराठी जगात आणखी एक काळ असतो तो म्हणजे कायम पडता काळ! अर्थात मराठी साहित्य व्यवहारातील ग्रंथ प्रकाशने, साप्ताहिके, मासिके या संबंधांतील अनेकानेक अनुभव पाहून त्यांनी काढलेले हे अनुमान होते. त्यात तथ्य नाही असे कोण म्हणेल? उदय म्हटला की, त्याचा अस्त होणार हे अटळच आहे, पण हे स्वीकारायला सहजासहजी कुणी तयार होत नाही. मग त्याचे श्रेय वा अपश्रेय याची मीमांसा केली जातेच असे नाही. एखाद्या लेखावर हे भागवले जाते किंवा ह. मो. मराठे यांच्यासारखा लेखक ‘मधले पान’ आत्मकथनात ‘घरदार’ मासिकासंदर्भात त्याच्या उत्कर्षाची आणि पतनाची कहाणी रंगवून सांगतो, पण ते एकच प्रकरण असते. या पार्श्वभूमीवर ‘अंतर्नाद’चे संपादक म्हणून ज्यांची ख्याती झाली त्या भानू काळे यांनी आपल्या या मासिकाचा उदय आणि अस्त कसा झाला याची विस्तृत कहाणी ‘एका मासिकाचा उदयास्त’ या ग्रंथात सांगितली आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे एखादे नियतकालिक प्रत्यक्षात कसे सुरू होते आणि कसे बंद पडते याविषयीचे हे आगळेवेगळे पुस्तक मौज प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले आहे.

मराठीत जेव्हा केव्हा मासिक निघते तेव्हा ते कायम प्रतिकूल परिस्थितीतच काढावे लागते. मग त्याला भानू काळे तरी अपवाद कसे असतील? शिवाय अशा वेळी सावध सल्ला देणारेदेखील असतातच. त्याप्रमाणे एका पत्राला उत्तर देताना विजय तेंडुलकर यांनी त्यांना लिहिले, ‘नवे मासिक सुरू करायचा तुमचा विचार नक्कीच धाडसी आहे. मनपूर्वक आणि कष्ट घेण्याची तयारी या एवढय़ावरच धंदा उभा राहू शकत नाही आणि मासिक ही हौस म्हटली तर ती खूप महाग हौस ठरण्याची शक्यता आहे. तुम्ही मनाशी घेतले आहे त्या प्रकारच्या मासिकाची गरज लेखकांना वाटते; पण ती गरज वाटणारे वाचक किती आहेत ते तपासून पहा. तुम्ही लेखक आहात म्हणून काळजी वाटते.

संपादनापायी तुमचे लेखन मागे पडू नये. शुभेच्छा आहेत, पण अजून विचार करा अशी प्रेमाची सूचना.’ अर्थात पूर्ण विचारांती भानू काळे यांनी या व्यवसायात पडायचे ठरवल्यामुळे मासिक सुरू केले. ऑगस्ट 1995 ते 2020 पर्यंत त्यांनी ही खिंड नेटाने लढवली. या वाटचालीत त्यांनी जी हिरवळ आणि होरपळ अनुभवली ती विस्ताराने मांडली आहे. त्यात मग संपादकाची उमेद वाढवणारे यशवंत रांजणकर दिसतात, काळे यांच्यामागे उभे राहणारे दत्तप्रसाद दाभोळकर आणि तुमचा सध्याचा अर्थपुरवठा खूप अपुरा असल्याने ‘अंतर्नाद’च्या भावी काळासाठी तो काही कामाचा नाही, असे अर्थभान देणारे सुरेश भट दिसतात. अशी वेगवेगळय़ा व्यक्तिमत्त्वाची माणसे भेटत राहतात.

यास्मिन शेख, मुकुंदराव किर्लोस्कर आणि श्री.पु.भागवत यांच्याबद्दल लिहिताना काळे म्हणतात, “सुदैवाने अशी माणसे माझ्या जीवनात आली, त्यांच्या सावलीत काही काळ विसावता आले, थोडेफार शिकता आले, हे माझे मोठेच भाग्य…”
मासिक संपादित आणि प्रकाशित करताना जे जे अनुभव आले, मग ते साहित्य संमेलन असो, वाङ्मय असो वा पर्यावरणातील कॉलेज आणि तेथील अनास्थेचे प्रदूषण, साहित्य अकादमी, स्वातंत्र्य म्हणजे काय? मराठी संपादकांना एकत्र आणण्याचा प्रयोग, खरे तर फसलेला प्रयोग म्हणून या सगळ्या आलेल्या अनुभवातून उद्विग्नता येऊन भानू काळे यांनी मासिक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या संबंधात ते म्हणतात, आशावादी, पण भ्रामक चित्रणावर विसंबून स्वतचे उर्वरित आयुष्य पणाला लावण्यात अर्थ नव्हता. उसने अवसान आणणे आता शक्यही नव्हते.

अखेर या सर्वांचा जणू ल.सा.वि. म्हणून काळे भरतवाक्य लिहितात…‘अंतर्नाद’च्या पूर्वतयारीचा काळ आणि नंतरची आवराआवर करायचा काळ विचारात घेतला तर 1993 ते 2022 अशी साधारण तीस वर्षे ‘अंतर्नाद’च्या उदयास्ताने माझे भावविश्व व्यापले होते. मुद्रण व्यवसाय बंद केल्याचा, मुंबई सोडल्याचा, ‘अंतर्नाद’ सुरू केल्याचा पश्चात्ताप आम्हाला कधीच झाला नाही. अडचणी येतच गेल्या, पण प्रयत्नांती त्याच्यावर मातही करत गेलो आणि जेव्हा जेव्हा एकेका अडचणीवर मात करत गेलो तेव्हा त्याचा खूप आनंदही मिळत गेला. तो आनंद कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. माडगूळकर म्हणतात तसे ‘लुटून नेशी काय काळा, सौख्य माझे मागले, भोगले ते भोगले…’ हे समाधान आज मनात आहे. हाच अनुभव वाचतानादेखील येतो हे एका मासिकाच्या उदयास्ताचे यश आहे.