आम्हाला उमेदवार बदलून हवा; डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात मालेगावात होर्डिंग

दहा वर्षांपासून हरवलेल्या खासदाराचे हिंदुत्वासाठी योगदान काय, असा सवाल करीत धुळे मतदारसंघातील भाजपाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला मालेगावातून होर्डिंगद्वारे विरोध करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री हे होर्डिंग काढण्यात आले असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव-धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी भाजपाच्या दुसऱया यादीत जाहीर करण्यात आली. ‘असा खासदार मान्य आहे का?’ या मथळ्याखाली मालेगावात होर्डिंग लावण्यात आले होते. ‘गेल्या दहा वर्षांपासून हरवलेले, शारीरिक क्षमता नसलेले, खासदारकीला न्याय न देणारे खासदार आम्हाला नको’ या मजकुराने डॉ. भामरे हे अकार्यक्षम असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. या मतदारसंघात हिंदुत्वासाठी यांचे योगदान काय, असा सवाल करण्यात आला आहे. हे होर्डिंग कोणी लावले याचा उल्लेख नसला, तरी भाजपा व मिंधे गटातील उमेदवारीच्या स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादाचे हे पडसाद असल्याचे बोलले जात आहे.