
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामात हल्लाकरून दहशतवाद्यांनी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी मोठी चूक केली आहे. याची जबर किंमत त्यांना चुकवावी लागेल, असा खणखणीत इशारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. असे भ्याड हल्ले करून शेजारील देश हा आमच्या देशात अराजकता माजवण्याचा, आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्हाला कुणी वेगळे करू शकत नाही. हा देश एक आहे आणि अशा हल्ल्यांना न घाबरता आम्ही मुँह तोड़ जवाब देऊ, असं नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितलं.
A grateful nation bows to the martyrs of Pulwama.
A befitting reply will be given to the perpetrators of the heinous attack and their patrons.
No force will succeed in disturbing peace, progress and stability of India. pic.twitter.com/hFq0pUByVJ
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2019
दिल्लीत ‘वंदेभारत एक्सप्रेस’ला आज हिंरवा कंदील दाखवण्यात आला. हा कार्यक्रम सुरू होण्याआधी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मौन पाळण्यात आले. कार्यक्रमावेळी कोणतीही सजावट न करता केवळ उद्घाटन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. या भाषणातून मोदींनी दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यावर सडेतोड उत्तर देऊ असे म्हणत देशातील जवानांच्या आणि जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, आम्ही कालच्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या जवानांना पूर्ण सूट दिली आहे. देशाच्या कामी आलेल्या जवानांवर आम्हाला गर्व आहे. त्यांनी आपल्या देशाचे रक्षण करताना बलिदान दिले. त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही.
जवानच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुखात आम्ही सारे आणि संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे. देशातील प्रत्येकाच्या मनात एक चिड आणि आक्रोश आहे. काही तरी केले पाहिजे, त्यांना धडा शिकवले पाहिजे अशाच सगळ्यांच्या भावना असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. जे गुन्हेगार आहेत त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागतील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
अनेक जण आमच्यावर टीका करत आहेत, त्यांनी तसे करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. कारण हल्ले करणाऱ्यांच्या विरुद्ध त्यांच्या मनात भावना आहेत. मी त्यांच्या भावनांशी पूर्ण सहमत आहे. त्यांच्या भावनांचा आदर करतो. पण त्याचवेळी एक विनंती आहे की, राजकीय कटुता सोडून एकत्र येऊ, देश एकत्र आहे, हे जगाला कळले पाहिजे कारण आम्ही जिंकण्यासाठी लढाई करत आहोत.
एक मत, एक स्वर, एक दिशेन चाललो तर दहशतवाद टिकणार नाही. दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र होऊन लढावेच लागेल, असेही ते यावेळी म्हणाले.
देशाची सुरक्षा आणि देशाची समृद्धी या दोन स्वप्नांसाठी जवान आपलं जीवन समर्पित करतात. तेव्हा त्यांच्या या बलिदानाला व्यर्थ जाऊ देणार नाही. गेल्या चार वर्षात देशाने प्रगती केली आहे आणि जवानांनी पाहिलेल्या देशाच्या समृद्धीच्या स्वप्नांसाठी असाच प्रगती करत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

























































