आणखी चार दिवस अवकाळीचा राज्यात मुक्काम; वाढत्या तापमानापासून दिलासा

आता एप्रिल महिना म्हणजे ऐन उन्हाळ्याचा महिना सुरू झाला असला तरी हवामानात सातत्याने बदल होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात आठवड्याभरापासून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे वाढत्या तापमानापासून काही दिलासा मिळाला आहे. मात्र, आता आणखी चार दिवस अवकाळी पावसाचा राज्यात मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. तसेच वादळीवार आणि गारपीटीनेही मोठे नुकसान झाले आहे. आता आणखी चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर बीड, लातूर, धाराशिव, सांगली, परभणी, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर व सोलापूरात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी तूरळक पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.